मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटामध्ये धामणदिवी येथे कंटेनर कलंडून नुकसान झाले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटामध्ये असलेल्या धामणदिवी गावालगत गुरुवारी पहाटेच्या सुमारास एक कंटेनर कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, कशेडीतील वाहतूक पोलिसांनी तातडीने एकेरी वाहतूक सुरू केल्याने महामार्गावरील वर्दळ सुरळीत राहिली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणदेवी गावालगत मुंबई ते चिपळूण असा कंटेनर (एमएच ४६, बीएफ २८१३)वरील चालक मोहम्मद अहमद सिद्दिकी (२६, रा. इलाहाबाद, जमालपूर, कराली, उत्तर प्रदेश, सध्या राहणार न्हावाशेवा, उरण) हा चालवित घेऊन येत होता. त्याच्या पुढे असलेली कार कंटेनरला ओव्हरटेक करीत असता कंटेनर चालकाने गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला नेल्याने महामार्गावर पलटी झाला. अपघातामध्ये वाहनाचे नुकसान झाले असून, चालकाच्या उजव्या पायाला मुका मार लागला आहे. या कंटेनरच्या क्लीनरलाही दुखापत झाली आहे. कशेडी येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बोडकर यांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीने तातडीने एकेरी वाहतूक सुरू केली. अपघातग्रस्त कंटेनर महामार्गावरून क्रेनच्या साहाय्याने काढून उभा करण्याची तरतूद कशेडी येथील वाहतूक पोलिसांनी केली आहे.