लोकमत न्यूज नेटवर्क खारेपाटण:
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगीवे येथे आज सकाळी ९.३० वाजता एका अवघड वळणावर आयशर १६ चाकी कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कंटेनर पलटी झाला. तर या अपघातात चालक निकलेश कुमार कौल वय - 22 राहणार चुराहाट ,जिल्हा - सिद्धी, मध्यप्रदेश हा किरकोळ जखमी झाला.
याबाबत अधिक वृत्त असे की गोवा वरुन आलेला आयशर कंटेनर अवजड वाहन क्र. N L01AD - 8776 हा झेरॉक्स पेपर गठ्ठे १४ टन माल घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना आज सकाळी ९.३० वाजता मुंबई गोवा महामार्ग नडगीवे येथे चालक निकलेश कुमार कौल याचा वाहनवरील ताबा सुटून रस्त्याचे दुभाजक क्रॉस करून कंटेनर सुमारे ६० फूट लांब फरफटत जाऊन पलटी झाला.वाहन चालक निकलेश कुमार याच्या उजव्या हाताला व पायाला मार बसला त्याला तातडीने खारेपाटण प्रा. आ केंद्र येथे दाखल करून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
अपघाताची माहिती समजताच खारेपाटण पोलिस स्टेशनचे प्रमुख श्री उद्धव साबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली.यावेळी पोलिस कॉन्स्टेबल पराग मोहिते उपस्थित होते. अपघात एवढा भयंकर होता की या दरम्यान एखादे वाहन समोरून आले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. अपघाताचा अधिक तपास खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे कर्मचारी करीत आहेत.