रत्नागिरी : गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती. मात्र, गुरूवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढण्यास सुरूवात झाली आहे. हवामान खात्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती.
गेले दोन आठवडे पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती. दिवसभर उन्हाचा कडाका असल्याने उकाड्याला प्रारंभ झाला आहे. जून आणि जुलैमध्ये पाऊस भरपूर झाला असला तरीही ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण घटले आहे. हवामान खात्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. गुरूवार रात्रीपासून ठरावीक सरी जोरदार पडत आहेत. गुरूवारी रात्री पावसाने जोर घेतल्याने जोरदार पावसाचे पुनरागमन झाल्याचे वाटत होते.
शुक्रवारी सकाळी पुन्हा पावसाने जोर घेतल्याचे चिन्ह दिसू लागले होते. दुपारपर्यंत पाऊस सरींवर होता. मात्र, त्यानंतर पुन्हा ऊन पडू लागले. सायंकाळीही पावसाची विश्रांती होती. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्याने गणेशोत्सवावर पावसाचे सावट राहणार की काय, ही चिंता गणेशभक्तांना लागून राहिली आहे.