रत्नागिरी : लग्नासाठी आलेल्या जावयाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी कोळंबे (ता. रत्नागिरी) येथे घडली. अनंत अर्जुन तेरवणकर (५२. रा. गोळप, तेरवणकरवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव असून, ते एका लग्न समारंभारासाठी आले होते. या घटनेनंतर गोळप परिसरात शोककळा पसरली होती.रत्नागिरीतील कोळंबे येथे गुरूवारी लग्न होते. या लग्न समारंभासाठी अनंत तेरवणकर व त्यांचे कुटुंबीय गेले होते. लग्न समारंभ आटोपून अनंत तेरवणकर आज दुपारी कोळंबे येथे धरणात आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते बुडू लागले. या धरणाजवळ कपडे धुवायला गेलेल्या महिलांनी त्यांना बुडताना पाहिले. महिलांनी गावात येऊन या घटनेची माहिती दिली.ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन अनंत तेरवणकर यांना पाण्याबाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याबाबत पूर्णगड पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरु होते. अनंत तेरवणकर हे गोळप येथे एका बागेत कामाला होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगी व भाऊ असा परिवार आहे.
धरणात आंघोळीसाठी गेलेल्या जावयाचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 6:14 PM