रत्नागिरी : हवामानात गेले चार दिवसात बदल झाला असून, थंडीचे प्रमाण कमी झाले असून, उष्मा वाढला आहे. शिवाय काही झाडांना पुनर्मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. हवामानातील बदलामुळे तुडतुडा व थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. काळा, पांढरा थ्रीप्स मोहोर व फळांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. थ्रीप्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करूनसुध्दा योग्य उपयोग होत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत.यावर्षी पावसाचे प्रमाणच अल्प राहिले आहे. आॅक्टोबरपासून थंडी सुरू झाली. परंतु, सातत्याने एकसारखे हवामान नव्हते. वेळोवेळी हवामानात बदल होत होता. ८० टक्के सर्वत्र पालवी होती. ही पालवी जून होऊन मोहोर येण्यास अवधी गेला. काही दिवस असलेल्या थंडीमुळे पोषक हवामान तयार झाल्यानंतर मोहोर सुरू झाला. मात्र, नोव्हेंबरमध्ये झालेला अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा त्याला फटका बसला.
मोहोर वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड केली. डिसेंबरपासून पुन्हा थंडीचे प्रमाण वाढले. थंडीमुळे मोहोर प्रक्रिया वेगाने सुरू झाली. सध्या सर्वत्र आंबा कलमांना चांगला मोहोर आला आहे. कणीपासून वाटाणा, आवळा, सुपारी इतकेच नव्हे तर बोराएवढाही आंबा झाला आहे.
थंडीचे प्रमाण अधिक राहिल्यामुळे मोहोरातून पुनर्मोहोर सुरू झाल्यामुळे फळधारणा झाली होती, तेथेच मोहोर आल्यामुळे गळ सुरू झाली असून, त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ लागला आहे. मोहोर आल्यामुळे फळधारणा झालेल्या फळांना पोषक खाद्य मिळत नसल्यामुळे कैरी पिवळी पडून गळू लागली आहे. त्यामुळे झाडाखाली कैऱ्यांचा खच पडला आहे.मोहोरातून थ्रीप्सचा प्रादुर्भाव असल्यामुळे फळांवरही तो होत आहे. मोहोराबरोबर फळांतील रस शोषला जात असल्यामुळे मोहोर काळा पडत आहे, तर फळातील रस शोषला जात असल्यामुळे हिरवे फळ चिकूसारखे होत आहे. सेंद्रीय, रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करूनही थ्रीप्स नष्ट होत नसल्यामुळे शेतकरी चिंतात्रस्त झाले आहेत.
यावर्षी पारा जिल्ह्यात अन्यत्र १५ ते १६ अंश, दापोलीमध्ये तर पारा ९ अंश सेल्सियस इतका खाली आला होता. मात्र, काही दिवसात पुन्हा उष्मा वाढला आहे. हवामानात होणाऱ्या बदलांमुळे मोहोरावर उंट अळी, हिरव्या किडीचा प्रादुर्भाव वाढला असून, ही कीड मोहोर कुरतडून टाकत आहेत. शिवाय तुडतुडाही कमी होत नाही. काळा व पांढरा थ्रीप्स मोहोराबरोबर फळांचे नुकसान करत आहे. महागडी कीटकनाशके वापरूनही नियंत्रणात येत नसल्यामुळे यावर संशोधन करणे गरजेचे आहे.- उमंग साळवी, शेतकरी, पावस