रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून गोव्याकडे निघालेल्या मांडवी एक्सप्रेसचे इंजिन आज दुपारी चिपळुण स्थानकात बंद पडले. अखेर तीन वाजल्यानंतर मालगाडीचे इंजिन मागवून मांडवी एक्सप्रेस गोव्याकडे पाठविण्यात आली. त्यामुळे मांडवी आज तब्बल चार तास उशिराने धावत असून प्रवाशांचे हाल झाले. सातत्याने मांडवी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड होण्याचे प्रकार वाढल्याने रेल्वे प्रवाशांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मांडवी एक्सप्रेस या मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीची रत्नागिरी येथे येण्याची वेळ दुपारी १.१५ वाजता अशी असून चिपळुणात ही गाडी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास येते. मात्र आज मांडवी एक्सप्रेस १.१५ वाजता चिपळूणमध्ये आली अन गाडीचे इंजिनच बंद पडले. सुरुवातीला गाडी इतका वेळ का थांबली, याबाबत कोणतीच माहिती प्रवाशांना नव्हती. नंतर इंजिन बंद पडल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मालगाडीचे इंजिन मागवून मांडवीला जोडण्यात आले व चिपळुणातून तीन वाजल्यानंतर ही गाडी मडगावकडे रवाना झाली. रत्नागिरीत मांडवी एक्सप्रेस सायंकाळी ५.१५ वाजता आली. (प्रतिनिधी)रत्नागिरी-दादर पॅसेंजरही नेहमीच उशिराने?कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या ‘मांडवी एक्सप्रेस’ची ही स्थिती असतानाच रत्नागिरी ते दादर दररोज जाणाऱ्या प्रवासी गाडीची स्थितीही दयनीय आहे. दर गुरूवारी ही गाडी धुण्यासाठी नेली जाते. त्यामुळे गुरुवारी तब्बल दीड तास गाडी उशिराने जाते. मात्र, त्याव्यतिरिक्त इतर दिवशीही गाडी अर्धा तास उशिराने धावण्याचा प्रकार वाढला आहे. उशिराने गाडी सुटल्याने दादरऐवजी ही गाडी काहीवेळा दिवा येथे थांबते व तेथूनच रत्नागिरीकडे परत येते. त्यामुळे, प्रवासी संतप्त असून रेल्वेने या गाडीचे वेळापत्रक पाळावे, अशी मागणी होत आहे.
‘मांडवी’चे इंजिन बंद पडल्याने प्रवाशांचे हाल
By admin | Published: February 10, 2015 11:00 PM