रत्नागिरी : शहरातील सुधारित नळपाणी याेजनेचे काम लवकरच पूर्ण हाेऊन खराब रस्त्यातून रत्नागिरीकरांची लवकरच सुटका हाेण्याची आशा हाेती. नगराध्यक्षांनीही दाेन महिन्यात रत्नागिरीतील रस्ते गुळगुळीत करण्याचे आश्वासन दिल्याने आशा पल्लवीत झाल्या हाेत्या. मात्र, या कामासाठी डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याने रत्नागिरीकरांना पावसाळ्यात चिखलमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याची पाइप लाइन खराब झाल्याने नवीन सुधारित नळपाणी याेजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शहरातील अनेक भागांत रस्त्याच्या बाजूला खोदाईचे काम करण्यात आले. या खोदाईमुळे अनेक ठिकाणी अर्धा रस्ताच गायब झाला आहे. या नळपाणी याेजनेबराेबरच शहरात गॅस लाइन आणि केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले हाेते. ही कामे पूर्णत्वाला गेली असून, अजूनही नळपाणी याेजनेचे काम पूर्ण झालेले नाही. शीळपासून हे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण हाेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले हाेते. त्यामुळे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी दाेन महिन्यांतच शहरातील सर्व रस्ते गुळगुळीत करून नागरिकांचा त्रास कमी करण्याचे आश्वासन दिले हाेते.
नगराध्यक्षांच्या या आश्वासनामुळे पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते गुळगुळीत हाेऊन प्रवास सुखकर हाेण्याची आशा निर्माण झाली हाेती. मात्र, नळपाणी याेजनेच्या कामासाठी ठेकेदाराने ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ मागितली आहे. नगरपरिषदेने ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत पावसाळ्याच्या कालावधीत काम करणे मुश्कील हाेणार आहे. त्यातच पावसाळ्यात रस्ता डांबरीकरणाची कामे न करण्याचे निर्देश शासनाकडून दिलेले आहेत. काम पूर्ण झाल्याशिवाय मारलेला चर बुजविताना येणार नाही. अनेक ठिकाणी अजूनही चरामधील माती तशीच ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी माती टाकल्याने उंचवटे तयार झाले आहेत. पावसाळ्यातही हे चर, तसेच राहणार असल्याने रस्ता चिखलमय हाेण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना चिखलमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागणार आहे.
चाैकट
अपघातांचा धाेका अधिक
अर्धवट राहिलेल्या चरांमधील माती पावसाळ्यात आणखी खाली जाऊन त्याठिकाणी खड्डा पडण्याची भीती अधिक आहे. या खड्डयात पाणी साचल्याच नागरिकांच्या ताे लक्षात येणार नाही. त्यामुळे त्यात वाहन फसण्याचा किंवा पादचारी अडकून पडण्याचा धाेका अधिक आहे. त्यामुळे अपघातांचा धाेका वाढणार आहे.