मेहरून नाकाडेरत्नागिरी : जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू लागला असल्याने ग्राहकांमधील भीतीही बऱ्यापैकी कमी झाली आहे. दसरा, दीपावलीचा सण तोंडावर असून, तुलसी विवाहानंतर लग्नसराई सुरू होणार आहे. त्यामुळे ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत. परिणामी बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढू लागली आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून बाजारपेठेला चांगलाच फटका बसला होता. एप्रिल, मे महिन्यात लग्नसराईमुळे वर्षभराच्या ६० टक्के व्यवसाय होतो. मात्र, लॉकडाऊनमुळे कोट्यवधीचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. गणेशोत्सवातही बाजारपेठ शांत होती. त्यामुळे यावर्षी मान्सून सेलऎवजी व्यापाऱ्यांनी आता सेल लावले असून, २५ ते ३० टक्के विक्रीत सवलत देण्यात येत आहे.तुलसी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ होणार असल्याने ग्राहकांनी खरेदी सुरू केली आहे. लॉकडाऊनपासून ठप्प असलेले बाजारापेठेतील व्यवहार आता पूर्वपदावर येऊ लागले आहेत.
कोरोना कालावधीत सहा महिन्यात प्रचंड मंदीचा सोसावी लागली. परंतु दसरा-दिवाळीमुळे ग्राहकांनी आता खरेदी सुरू केली आहे. तयार कपड्यांना विशेष मागणी असून, ग्राहकांसाठी खरेदीमध्ये सवलत दिली आहे. दीपावलीनंतर लग्नसराई असल्याने खरेदीसाठी गर्दी वाढेल, अशी अपेक्षा आहे.- अविनाश विश्वकर्मा, विक्रेता
ग्राहकांमधील कोरोनाची भीती कमी झाली असल्यानेच खरेदीसाठी लोक घराबाहेर पडू लागले आहेत. कोरोनामुळे लग्नसोहळे रद्द करण्यात आले होते. मात्र, दीपावलीनंतर लग्नसमारंभ असल्याने खरेदीसाठी ग्राहक घाई करू लागले आहेत. यावर्षी ग्राहकांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला. परंतु दसरा-दिवाळीची खरेदी मात्र सुरू केली आहे.- संजय जैन, विक्रेता