आॅनलाईन लोकमत
दापोली, दि. १ : दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे सन २००७-0८ साली सुमारे ६५ लक्ष रुपये खर्च करून बोरथल येथील नदी किनारी विहीर मारुन सुरू केलेली नळपाणी पुरवठा योजना गेली दोन महीने पम्प नादूरूस्त झाल्यामुळे बंद आहे. यामुळे आंजर्ले येथील भंडारवाडा, बिरवाडी, कातळकोंड, चिखलतळे या वाड्यांना पाण्याचे प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.ऐन उन्हाळ्यात महिलांना एक ते दीड किलोमीटर पायपीट करून डोकयावरुन पाणी आणण्याची वेळ आली आहे. सदर पाणी योजना बंद झाल्यामुळे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून नवीन नळपाणी पुरवठा योजना सुरू केली असल्याने काही अंशी नागरिकांचे हाल कमी झाले आहेत. तरी देखील इतके रुपये खर्च करून सुरू झालेली ही योजना इतकया लवकर बंद पडल्यामुळे व सदर योजने बद्दल अनेक प्रश्न केले जात आहेत. तसेच या योजनेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखीील नागरीकांकडून होत आहे. बंद असलेल्या योजनेबाबत आंजर्ले सरपंच संदेश देवकर यांना विचारले असता या योजनेचे दोन्ही पंप नादुरस्त झाले आहेत, हे पंप दुरूस्तीकरीता कोल्हापुर येथे पाठवण्यात आले आहेत. नवीन पंप घेण्यास ग्रामपंचायतीकडे पुरेशी पाणीपट्टी वसूली न झाल्यामुळे पुरेसा निधी उपलब्ध नव्हता. हा निधी उपलब्ध झाला असून, लवकरच नवीन पंप जोडून योजनेचे पाणी ग्रामस्थांना मिळेल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)