रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याला सोमवारीही जोरदार फटका बसला. मुसळधार पावसामुळे चिपळूण शहराची बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पडत असलेला पाऊस आणि सह्याद्रीच्या खो-यात पडणारा पाऊस यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळी वाढली आहे. त्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच चिपळूण शहरात पाणी वाढू लागले. प्रथम बाजारपेठ भाग आणि त्यानंतर चिंचनाका भाग पाण्याखाली गेला. शहरातील मुख्य बस स्थानकादरम्यानही ढोपरभर पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.चिपळूण तालुक्यातील कालुस्ते येथे दरड कोसळून दहा घरांना धोका निर्माण झाला आहे.
चिपळूणप्रमाणेच खेडलाही पावसाचा फटका बसला आहे. जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्या पुलावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. त्याचप्रमाणे शहरातील मच्छीमार्केटही पाण्याखाली गेले आहे. जगबुडी नदीचे पाणी ७ मीटरपर्यंत वाढल्यानंतर धोक्याची सूचना दिली जाते. आता पाणी आठ मीटरपर्यंत वाढले आहे.