राजापूर : कोकण रेल्वेमार्गावरील सौंदळ येथील व्हॉल्ट स्टेशनला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच, कोरोनामुळे गेले वर्षभराहून अधिक काळ या मार्गावरील दोन्ही पॅसेंजर बंद असल्याने या स्थानकात शुकशुकाट पसरला आहे. कोकण रेल्वे मार्गावर मुंबईसह लांब पल्ल्यांच्या गाड्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या. मात्र, दोन्ही पॅसेंजर अद्याप सुरू न झाल्याने हे स्थानक शांतच आहे.
स्थानिक जनतेची जोरदार मागणी व प्रा.चंदुभाई देशपांडे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर सौंदळ येथे कोकण रेल्वेतर्फे सौंदळ व्हॉल्ट स्टेशनला मान्यता मिळाली होती. त्यानंतर, वर्षभरातच त्याची उभारणी करण्यात आली. माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने या व्हॉल्ट स्टेशनला मान्यता मिळाली होती. सध्या या स्टेशनला थांबा देण्यात आल्याने मुख्य मार्गावर दोन पॅसेंजरना थांबा मिळाला. तालुक्याच्या पूर्व भागासह शहरानजीकच्या गावांना हे व्हॉल्ट स्टेशन अधिक फायदेशीर ठरत आहे.
कोकण रेल्वे मार्गावर गेल्या काही महिन्यांत मुंबईसह लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र, त्या गाड्यांना ठरावीक स्थानकात थांबे असल्याने तेथील प्रवाशांना रेल्वेचा प्रवास करता आला. गेले वर्षभर दोन्ही पॅसेंजर बंद असल्याने बहुसंख्य स्थानकातील प्रवाशांना रेल्वेने प्रवास करता येत नाही. कोकण रेल्वे प्रशासनाने दोन्ही पॅसेंजर सुरू करायला अद्याप परवानगी दिलेली नाही. रेल्वे बंद असल्याने स्थानकातील प्रवाशांची वर्दळही थांबली आहे.
..........................................
पंचवीस लाखाहून अधिक उत्पन्न
या मार्गावर दोन्ही बाजूने धावणारी दिवा-सावंतवाडी व मडगाव-रत्नागिरी - दादर या दोन पॅसेंजर गाड्यांना थांबे देण्यात आले होते. त्यामध्ये सकाळी मुंबईकडे जाणारी सावंतवाडी-दिवा या गाडीच्या माध्यमातून कोकण रेल्वेला या व्हॉल्ट स्टेशनच्या येथून चांगले उत्पन्न मिळाले. दररोज येथून सुमारे शंभरहून अधिक प्रवाशी मुंबईकडे प्रवास करीत असत. गेल्या दोन वर्षांत येथून कोकण रेल्वेला सुमारे पंचवीस लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.