रत्नागिरी : आठ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या एका तरूणाचा राजापूर तालुक्यातील पाचल येथील अर्जुना धरणात बुडून मृत्यू झाला. शशी लक्ष्मण खेडेकर (२४) असे त्याचे नाव असून, तो पाचलमधीलच रहिवासी होता.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात केवळ राजापूर तालुक्यातच पाऊस पडला असून, इतरत्र अजून पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मात्र, सोमवारी वादळी वाऱ्यामुळे खेड आणि चिपळूण तालुक्यात सात घरांचे ४६ हजारांहून अधिक नुकसान झाले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शशी लक्ष्मण खेडेकर हा पोहण्यासाठी अर्जुना धरणामध्ये गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. आठच दिवसांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्यामुळे त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यात अजूनही पावसाचे आगमन झालेले नाही. सोमवारी सकाळपासून मंगळवारी सकाळपर्यंत केवळ राजापूर तालुक्यात ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. इतरत्र कोठेही पाऊस पडलेला नाही.
सोमवारी वादळी वाऱ्यांमुळे खेड तालुक्यात मौजे वावेतर्फ नातू येथे सावित्री कदम (१८२० रूपये), पार्वती डांगे (५९१५ रूपये), सरस्वती भांबड (९५४० रूपये) आणि मारूती डांगे (२५८० रूपये) यांच्या घरांचे अंशत: नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात मौजे वेहळे येथे मानसिंग राजेशिर्के (९००० रूपये), सुरेश सिंगे (८७५० रूपये) आणि गोपाळ भोजने (९००० रूपये) यांच्या घरांचे अंशत: नुकसान झाले.