जिल्ह्यात सरासरी ३५९१ मिलिमीटर पाऊस पडतो. ६९ हजार ४७ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. दुय्यम पीक म्हणून नागली लावण्यात येत असून, १० हजार ९८ हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड केली जाते. १.४९ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, ०.६३ हेक्टर क्षेत्रावर गळितधान्य तसेच ०.४७ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य लावण्यात येते.
पारंपरिक पध्दतीने भात लागवड करण्यापूर्वी रोपे काढून लागवड केली जाते. त्यामध्ये सुधारित लागवड पध्दत, चारसुत्री लागवड, ‘श्री’ (एस. आर. आय.) लागवड, ड्रम सिडरने तसेच तिफणीच्या सहाय्याने पेरणी करण्यात येते. रोहिणी किंवा मृग नक्षत्रातच भात पेरणी केली जाते. साधारणत: वीस ते एकवीस दिवसांच्या रोपांची लागवड केली जात असल्याने जिल्ह्यातील विविध भागात शेतकऱ्यांनी भात लागवडीला प्रारंभ केला आहे.
पारंपरिक पध्दतीने भात बियाण्यांची पेरणी केली जाते. त्यानंतर रोपे काढून लागवड पध्दत प्रचलित आहे. पेरणीपूर्वी पेरणी क्षेत्राची भाजावळ करण्याची पध्दतही प्रचलित आहे. कृषी विद्यापीठातर्फे चारसुत्री पध्दत विकसित करण्यात आली आहे. एकाचवेळी भात बियाणे विशिष्ट अंतरावर पेरल्यानंतर पुन्हा लागवडीसाठी रोपे न काढता त्याचपध्दतीने रोपे उगवून पीक घेण्यात येत असल्याने सुधारित तंत्रज्ञानाचा वापरही शेतकरी करू लागले आहेत.
शासनाकडून शेतीला प्रोत्साहन देण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. सुधारित व संकरीत बियाण्यांचा वापर उत्पादकता वाढविण्यासाठी प्रमुख तंत्रज्ञान असून, अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित व संकरीत बियाण्यांचाही वापर शेतकरी करू लागले आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत भात बियाणे साखळी विकसित करणे तृणधान्य विकास कार्यक्रम १९९४-९५पासून राबविण्यात येत आहे. भात पिकाची प्रतिहेक्टरी उत्पादकता वाढविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेंतर्गत प्रात्यक्षिके घेण्यात येतात. या योजनेंतर्गत भाताची उत्पादकता वाढली असून, हेक्टरी २४.४३ क्विंटल झाली आहे. नागलीची उत्पादकता हेक्टरी १२.०९, कडधान्य ६.५, गळीतधान्य ४.०५, इतर तृणधान्ये ५.५ क्विंटल इतकी आहे. त्यासाठी शेतकरी विद्यापीठ प्रमाणित सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करत असतानाच खत, पाणी व्यवस्थापनाबरोबर कीड नियंत्रणाकडेही लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यासाठी १३ हजार मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झाले असून, आतापर्यंत दहा हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. सेंद्रिय शेतीचे प्रमाण जिल्ह्यात वाढत असतानाच रासायनिक खतांचा वापर करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
कोट घ्यावा :
पारंपरिक पध्दतीने पेरण्या करून नंतर रोपे काढून लागवडीची पध्दत सर्रास अवलंबली जाते. पावसावर अवलंबून असलेली शेती करताना सुधारित तंत्राचा अवलंब केला तर नक्कीच उत्पादकता वाढण्यास मदत होईल. पेरणीपूर्वी मशागत, जमिनीनुसार बियाणे निवड, बीजप्रक्रिया, खत, पाणी व्यवस्थापन, लागवडीची पध्दत, तण नियंत्रणाबरोबर भात किडीवरील प्रमुख किडींचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. लाल, काळा तांदूळ याचे वैद्यकीयदृष्ट्या असलेले महत्त्व लक्षात घेता यापासून पोहा, चुरमुराही तयार केला जातो. पोहा, चुरमुऱ्याला बाजारात चांगली मागणी असल्याने लाल तांदूळ, काळा तांदूळ लोकप्रिय होत आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या वाणांचा वापर शेतकरी करू लागले आहेत.
- विजय दळवी, संशोधन अधिकारी, भात संशोधन केंद्र, शिरगाव.