लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घोषित केले आहेत. मात्र अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. गतवर्षी लाॅकडाऊन काळात एसटीची चाके पूर्णत: थांबली होती. मात्र सध्या एस. टी. सेवा जिल्ह्यात सुरळीत सुरू असून, प्रवाशांचा अजून चांगला प्रतिसाद लाभत आहे.
शासनाने शनिवारी व रविवारी लाॅकडाऊन कडक करण्याच्या सूचना केल्या आहेत. नागरिकांना कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी प्रवाशांची संख्या विचारात घेऊनच संबंधित मार्गावरील प्रवासी सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एस. टी. प्रशासनाकडून त्याबाबत जिल्ह्यातील नऊ आगारांना सूचना देण्यात आल्या आहेत.
शासनाच्या सूचनेनुसार एस.टी.च्या प्रवासी क्षमतेनुसार प्रवासी वाहतूक सुरू आहे. उद्योग-व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी परवानगी असल्याने तसेच खासगी आस्थापना सुरू असल्याने नोकरदारासांठी एस.टी.ने प्रवासी वाहतूक करणे सोपे झाले आहे. शाळा महाविद्यालये बंद असली, तरी कामगार तसेच अन्य प्रवाशांचा प्रतिसाद अद्याप बऱ्यापैकी लाभत असल्याने नऊ आगारांतील सर्व मार्गावरील बसफेऱ्या पूर्ववत सुरू आहेत.
जिल्ह्यातील नऊ आगारांमध्ये ६१० बसेसव्दारे ४२०० फेऱ्या सुरू आहेत. दररोज दोन ते सव्वादोन लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत असून, दिवसाला ४७ ते ४८ लाख रुपयांचे उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त होत आहे. मात्र दिवसाचा डिझेल खर्च ५० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे प्राप्त उत्पन्नापेक्षा अधिक खर्च डिझेलसाठी होत आहे. याशिवाय स्पेअरपार्ट व अन्य खर्चासाठी महामंडळाकडून पैसे घ्यावे लागत आहेत. त्यामुळे सध्या व्यवसाय बुडीत असला, तरी अत्यावश्यक सेवा म्हणून प्रवासी वाहतूक सुरू आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. शनिवार व रविवार दोन दिवस कडक लाॅकडाऊन घोषित केले आहे. अत्यावश्यक सुविधा असल्याने प्रवासी वाहतूक सुरू आहे. शासन नियमांचे पालन करून मास्कशिवाय एसटीत प्रवेश दिला जात नाही. तसेच प्रत्येक फेरीनंतर बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शनिवार, रविवारी लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली असल्याने दोन दिवस प्रवाशांची संख्या विचारात घेऊन संबधित मार्गावरील फेऱ्या कमी-जास्त करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तशा सूचना प्रत्येक आगाराला देण्यात आल्या आहेत.