रत्नागिरी : कट्टरतावाद हा धर्माचे आवरण पांघरून येत असला तरी त्याची पाळंमुळं आर्थिक-राजकीय सत्तेत आहेत. आर्थिक राजकीय सत्ता काबीज करणं हा कट्टरतावादाचा हेतू आहे, धर्म केवळ निमित्तमात्र आहे, असे प्रतिपादन काॅ. किरण मोघे यांनी शहीद गौरी लंकेश यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘डाॅ. नरेंद्र दाभोलकर विचार जागर विशेषांका’च्या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमात केले. त्या ‘कट्टरतावादाचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आव्हान’ या विषयावर बोलत होत्या.
कट्टरतावादामुळे महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, कृष्णवर्णीय यांचे मानवी अधिकार हिरावले जाऊन त्यांचे जगणं मुश्कील होतं, या गोष्टीकडेही त्यांनी लक्ष वेधलं. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या नरेंद्र दाभोलकर विचार जागर विशेषांकाचे प्रकाशन डाॅ. शैला दाभोलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शैला दाभाेलकर म्हणाल्या, डाॅ. नरेंद्र दाभोलकर गेल्यानंतर व कोविड काळात आपल्यासमोर अनेक अडचणी आल्या. मात्र, तुम्ही सर्वांनी त्यावर केलेली मात मी पाहिली आहे. विचाराला कृतीची जोड असली पाहिजे, यासाठी डाॅ. दाभोलकर आग्रही होते. त्याचे दर्शन या अंकातून घडत आहे. आज डाॅ. दाभोलकर आपल्यात असते तर त्यांनाही तुमचे कौतुक वाटले असते, असेही त्या म्हणाल्या.
प्रमुख वक्त्या काॅ. किरण मोघे यांनी कट्टरतावाद कसा पेरला जातो, त्याचा आर्थिक राजकीय हितसंबंधासाठी कसा वापर केला हे, सध्याच्या घडीला चर्चेत असलेल्या तालिबानी दहशतवादाची उदाहरणे देऊन स्पष्ट केले. भारतातील कट्टरतावादाविषयी बोलताना काॅ. किरण मोघे म्हणाल्या, ‘डॉ. दाभोलकर, काॅ. पानसरे, प्रा. कलबुर्गी, लंकेश यांच्या हत्याही याच कट्टरतावाद्यांनी थंड डोक्याने, नियोजनबद्धपणे केल्या आहेत. या चौघांसारखे इतर अनेक सर्वसामान्यही या कट्टरतावादाचे बळी आहेत. २०१४ ला मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर पुण्यात पहिले माॅब लिन्चिग मोहसिन शेख यांचे झाले. त्यानंतर अशा इतक्या घटना घडल्या आहेत की, अशा घटनांबाबत आपल्याला काहीच वाटेनासे झाले आहे. इतके निर्ढावलेपण कट्टरतावादाने आपल्यात निर्माण केले आहे. यावर उपाय म्हणजे जनतेच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांनी एकजूट करून कट्टरतावादाला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे. तसेच वास्तव समजून घेण्यासाठी आपला अभ्यास, वाचन वाढविले पाहिजे’, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील अंनिसचे कार्यकर्ते, हितचिंतक या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले हाेते. कार्यक्रमाची सुरुवात विनोद वायंगणकर यांनी चळवळीचे गीत म्हणून केली. प्रास्ताविक प्रभाकर नानावटी यांनी केले. सूत्रसंचालन राहुल थोरात यांनी केले. आभार अनिल चव्हाण यांनी मानले.