रत्नागिरी : कर्मचारी बदली प्रकरण गेले आठवडाभर गाजत असून, चालक - वाहकांच्या आडमुठेपणामुळे प्रवासी मात्र वेठीस धरले जात आहेत. याबाबत विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांच्याशी चर्चा केली असता बेजबाबदार वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनातर्फे कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीद वाक्य असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा गावोगावी पोहोचली आहे. प्रवासी न घेतल्याच्या वादातून प्रवाशांच्या तक्रारीवर निर्णय घेत असताना चालकाची बदली शहरी वाहतुकीतून ग्रामीण फेरीसाठी करण्यात आली. त्यावर कर्मचारी संघटनांनी अचानक बंद पुकारल्यामुळे प्रवाशांचे नुकसान झाले. संबंधित बदली प्रकरण इतके गाजत आहे की, त्यामुळे प्रवाशांना त्याचा नाहक त्रास होत आहे.शहरी गाड्यांमधील नियम व क्षमतेप्रमाणे ४४+११ इतके प्रवासी काल घेण्यात आले. प्रिंदवणे, चिंचखरी, शिरगाव, म्हामूरवाडी, काळबादेवी, भावेआडोम या मार्गावरील थांब्यांवरचे प्रवासी न घेता केवळ ५५ प्रवाशांवरतीच वाहतूक करण्यात आली. यामुळे शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, वृद्ध, महिला प्रवाशांचे अतोनात हाल झाले.एस. टी.च स्पीड लॉक करून वेगावर मर्यादा आणल्याची तक्रार चालकांकडून होत आहे. परिणामी तीव्र वळणांवर किंवा चढण चढताना त्रास होतो. याबाबत विभाग नियंत्रक देशमुख यांनी वाढते अपघात, दुरुस्ती खर्च व डिझेल खर्च यावर नियंत्रण आणले जात असतानाच स्पीड लॉक करण्यात आले आहे. मात्र, हा निर्णय महामंडळाचा आहे. महामंडळातील विविध आगारांमध्ये गाड्यांच्या वेगावर मर्यादा आणण्यासाठी स्पीड लॉकचा वापर करण्यात येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.४४० चालकांपैकी काही नवीन चालक रत्नागिरी विभागामध्ये रुजू झाले आहेत. त्यामुळे यापुढे डबल ड्युटीचा ताण कमी होणार आहे. यापुढे चालकांना सलग दुहेरी ड्युटी करता येणार नाही. जेणेकरुन चालकांवरील ताण कमी होणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांसाठी प्रशासन नेहमीच बांधील असताना कर्मचारी प्रवाशांना वेठीस धरु पाहात असतील, तर अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बसचालकांच्या आडमुठेपणामुळे प्रवासी वेठीस
By admin | Published: December 23, 2014 10:12 PM