रत्नागिरी : दिपावलीचा सण साजरा करून पर्यटकांचे जिल्ह्यात आगमन सुरू झाले आहे. हिवाळी सुट्ट्या असल्याने गेल्या दोन दिवसापासून पयर्टनस्थळे गर्दीने फुलली आहेत. समुद्रकिनाऱ्याचे आकर्षक जास्त असल्याने पर्यटक बीचेसवर गर्दी करत आहेत. श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दिवसाला २० ते २५ हजार पर्यटक येत असल्याने मंदिरात दर्शनासाठी गर्दी होत आहे.दिवाळी सणाचा आनंद घेवून परजिल्ह्यासह, राज्यातील पर्यटक जिल्ह्यात येत आहेत. याशिवाय विदेशी पर्यटकांचे आगमन सुरू झाले आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने कुटूंबासह देवदर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. महाविद्यालयीन युवक तर ग्रुपने दुचाकीवर स्वार होत ट्रीप काढत आहेत. याशिवाय रिक्षा, कार, जीप, टेंम्पो ट्रॅव्हलर, खासगी बसेसमधून पर्यटक येत आहेत. परजिल्ह्यातील काही भागातून युवक पदयात्रेने गणपतीपुळेत दर्शनासाठी येत आहेत.देवदर्शनासह आसपासच्या पर्यटनस्थळाचा आनंद घेतला जात आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. समुद्रस्नानासह, वाॅटरस्पोर्टस्, घोडा, उंट सवारी केली जात आहे. पर्यटकांमुळे खाद्यपदार्थ, खेळणी विक्रीसह छोट्या मोठ्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत गर्दी राहणार असल्याचे सांगण्यात येत आहेत.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यातून भाविक गणपतीपुळेत येत आहेत. राज्य परिवहन महामंडळाने एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिल्याने महिला प्रवाशांची गर्दी वाढली आहे. ७५ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात १०० टक्के सवलत देण्यात येत असल्याने समवयस्क ग्रुप सहलींचे प्रमाण वाढले आहे.येणाऱ्या पर्यटकांपैकी अनेक पर्यटक एका दिवसात परत फिरतात. तर काही पर्यटक निवासासाठी थांबतात. गणपतीपुळेसह मालगुंड, नेवरे, भगवतीबंदर, आरेवारे येथील निवासव्यवस्थेचा आसरा घेत आहेत. गणपुतीपुळेसह काजीरभाटी, मालगुंड, आरेवारे, मांडवी, भाट्ये, गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी होत आहे.
गणपतीपुळेतील श्री गणेशमंदिरात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत असून दररोज १८ ते २० हजार भाविक दर्शन घेत आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर व परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.