रत्नागिरी : डॉक्टरांअभावी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सामान्य माणसांची गैरसोय होत आहे. रुग्णालयात निर्माण झालेल्या समस्यांप्रती तोडगा काढण्याच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (२० जून) धडक दिली.रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे सद्यस्थित एकही स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ तसेच अस्थिरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे सामान्य माणसांची गैरसोय होत आहे. सामान्य माणसांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली धडक मारली. या समस्या जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडून तात्काळ तोडगा निघण्याबाबत मागणी केली. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी निर्माण झालेल्या समस्या दूर करण्याच्या अनुषंगाने सचिव, आरोग्य विभाग, मंत्रालय यांच्याशी चर्चा करून उचित यंत्रणेच्या माध्यमातून तातडीने कार्यवाही करण्याचे मान्य केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले - गावडे उपस्थित हाेत्या.यावेळी आमदार राजन साळवी समवेत रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपतालुकाप्रमुख अभय खेडेकर, शेखर घोसाळे, प्रशांत सावंत, उपशहरप्रमुख बावा चव्हाण, नितीन तळेकर, विभागप्रमुख माया पाटील, विजय देसाई, प्रदीप घडशी, महेंद्र चव्हाण, किरण तोडणकर, अमृत पोकडे, संदीप सुर्वे, सलील डफाळे, दिलावर गोदड, बाबा नागवेकर, बिपिन शिवलकर, शरद राणे उपस्थित होते.
डॉक्टरांअभावी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात सामान्यांची गैरसोय, आमदार धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर
By मनोज मुळ्ये | Published: June 20, 2023 4:51 PM