रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सलग दोन दिवस सुरू आहे. बुधवारी (दि.४) रत्नागिरी विभागातील एकूण तीन हजार फेऱ्या बंद होत्या. दापोली, गुहागर, खेड आगारासह लांजा आगारातही कडकडीत बंद होता, मात्र अन्य आगारात समिश्र प्रतिसाद असला तरी ७० टक्के वाहतूक बंद होती.राज्य परिवहन महामंडळाच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी ‘महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती’ स्थापन केली आहे. एसटीच्या सर्व कामगार संघटना कृती समितीच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. राज्यभरात बैठकांचे सत्र थांबवून आंदोलन करण्याचा निर्धार कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आल्याने मंगळवारी (दि. ३) चालक-वाहक, यांत्रिक कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. काल, मंगळवारी (दि.३) राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या समवेत कृती समितीची मुंबईत बैठक झाली परंतु चर्चा फिस्कटल्याने कर्मचारी आंदोलनाच्या निर्णयावर ठाम राहिले. मंगळवारी दापोली, गुहागर, खेड आगारात कडकडीत बंद होता परंतु बुधवारी लांजा आगारातील कर्मचारी आंदोलनात सक्रीय झाल्याने लांजा आगारातही बंद होता. त्यामुळे या चारही आगारातील प्रवासी, नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल झाले.रत्नागिरी विभागातून दैनंदिन ७५० बसद्वारे ४५०० फेऱ्यांद्वारे दररोज दोन ते अडीच लाख किलोमीटर प्रवासी वाहतूक करण्यात येते. एसटी कर्मचारी संपामुळे पहिल्या दिवशी (मंगळवार दि.३) १८०० फेऱ्यांची ४० हजार किलोमीटरची वाहतूक बंद राहिल्याने १६ लाखांचे आर्थिक नुकसान झाले होते. आज, बुधवारी तीन हजार फेऱ्या बंद होत्या, ८० हजार किलोमीटर वाहतूक बंद राहिल्याने विभागाचे दिवसभरात ४० लाखाचे नुकसान झाले आहे. आंदोलनामुळे दोन दिवसात ५६ लाखाचे नुकसान झाले आहे.
ST Strike: रत्नागिरी विभागातील ३००० फेऱ्या बंद, ७० टक्के वाहतूक ठप्प
By मेहरून नाकाडे | Published: September 04, 2024 6:22 PM