रत्नागिरी : कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. काही गावांमधून तेरसे तर काही ठिकाणी भद्रे शिमगे साजरे करण्यात येतात. शहराच्या आसपासच्या गावातील पालख्या बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरीला भेटावयास येत असल्यामुळे दिवसभर शहरात ढोल-ताशांच्या गजरात आलेल्या पालख्यांमुळे शिमगोत्सवाचे उत्साही वातावरण तयार झाले आहे. फाक पंचमीनंतर ग्रामदेवतांना रूपे लावली जातात. त्यानंतर पालख्या बाहेर पडतात. या पालख्या शहरात श्री भैरीबुवाच्या भेटीला येतात. त्यानंतर त्या आपापल्या गावी शिमगोत्सवासाठी परततात. जवळपासच्या गावातील अनेक पालख्या पायी तर काही पालख्या टेम्पो अथवा ट्रकमधून येतात. जयस्तंभपासून पालख्या मंदिरापर्यंत पायी नेल्या जात असल्याने सध्या शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. जयस्तंभ, बसस्थानक परिसरातून वाहने मुंगीच्या पावलाने पुढे सरकत आहेत. दिनांक २३ मार्चपर्यंत शहरात विविध पालख्या येणार असल्यामुळे श्री भैरी देवस्थानतर्फे नियोजन करण्यात आले आहे.बच्चे कंपनीच्या पालख्याशिमगोत्सवामुळे बच्चे कंपनी देखील छोट्या पालख्या काढून परिसरातील घरोघरी घेऊन जात आहेत. पुठ्ठ्याच्या पालख्यात देवीचा फोटो ठेवून ढोल-ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढत आहेत. सध्या परीक्षांचा हंगाम असला तरी सुटीच्या दिवसात पालख्या नाचविण्यात येत आहेत.नमन व बहुरूपीशिमगोत्सवात गावोगावी नमन अथवा खेळे, संकासूर घरोघरी येतात. काही मिनिटांचा खेळ सादर करून दक्षिणा गोळा केली जाते. शिमगोत्सवात बहुरूपी देखील पोलिसांच्या वेशभूषेत येऊन बिदागी गोळा करत आहेत. शिमगोत्सव असल्यामुळे नागरिकही उत्साहाने काही पैसे हातात टेकवत आहेत.मुंबईकरांचे आगमनतेरसे शिमगोत्सवाला सुरूवात झाल्याने नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई व अन्य शहरात स्थायिक असलेली मंडळी गावी परतली आहेत. ग्रामदेवतेची पालखी घरी येत असल्यामुळे महिलावर्गामध्ये तर कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे. देवीची पूजा, ओटी भरण्यासाठी मंडळी आवर्जून गावी दाखल झाली आहे. होळी, गुडफ्रायडे, चौथा शनिवार व रविवारची सुटी जोडून आल्याने अनेक मंडळी गावी आली आहेत. काही गावातून शिमगोत्सवानंतर सार्वजनिक पूजा, उत्सव साजरे करण्यात येत असल्याने सध्या सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बारावी व महाविद्यालयीन परीक्षा संपल्या असल्या, तरी दहावीच्या परीक्षा अद्याप सुरू आहेत. शालेय परीक्षा होळीनंतर सुरू होणार असल्याने होळीसाठी कुटुंबातील एखादा सदस्य हजेरी लावत आहे. कोकण रेल्वे व एस. टी. महामंडळाने होळीसाठी खास जादा गाड्यांची सुविधा भाविकांना उपलब्ध करून दिली आहे. (प्रतिनिधी)
ढोल-ताशांच्या गजरात रत्नागिरीत दुमदुमतोय शिमगोत्सव
By admin | Published: March 20, 2016 9:28 PM