आवाशी : जयगड, रत्नागिरी येथून लाेटे औद्याेगिक वसाहतीत काेळसा घेऊन येणाऱ्या डम्परला अचानक आग लागली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून उडी घेतल्याने ताे बचावला असून, डंपरची केबिन पूर्णत: जळाली. ही घटना शनिवारी दुपारी ११.५० वाजता मुंबई गाेवा महामार्गावरील पीरलाेटे येथे घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जयगड रत्नागिरी येथून लोटे-परशुराम (ता.खेड) औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स लि. या कंपनीत दगडी कोळसा घेऊन येणाऱ्या डम्परच्या पुढील भागातून अचानक धूर येऊन आग लागली. कडक उन्हामुळे ही आग लागलीच भडकली व केबिन पूर्णपणे जळून गेली. चालकाने प्रसंगावधान राखत लागलीच उडी मारल्याने तो बचावला. लोटे पोलिसांना याची माहिती मिळताच, त्यांनी एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यांनीही तत्काळ घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. यामध्ये डम्परच्या केबिनचे जळून पूर्णपणे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी टळली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.