खेड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या सौजन्याने खेडमधील कळंबणी उपजिल्हा कोविड रुग्णालयात गेल्या चार महिन्यांपूर्वी देण्यात आलेले ड्युरा सिलिंडर ऑक्सिजन प्रणाली आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जीवनदायी ठरत आहे.
चोवीस जंबो सिलिंडरप्रमाणे सेवा देणारे एक ड्युरा सिलिंडर अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सीएसआर फंडातून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात चार ड्युरा सिलिंडर देण्यात आले. त्यामुळे रुग्णालयात ऑक्सिजन प्रणाली अधिक चांगल्या पद्धतीने सुरू झाली. खासदार सुनील तटकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. माजी आमदार संजय कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनीही ही मागणी केली होती.
कोरोनाच्या महाभयंकर लाटेवेळी संजीवनी म्हणून उपयोगी पडतील, अशी ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर प्रणाली काही महिन्यांपूर्वी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात देण्यात आली. जिल्ह्यात तसेच राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असतानाही खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ड्युरा सिलिंडर ऑक्सिजन प्रणालीमुळे रुग्णांना ऑक्सिजन आवश्यकतेनुसार मिळत आहे.
त्यामुळेच तीन तालुक्यांचे कोविड हॉस्पिटल असणाऱ्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासताना दिसत नाही. या रुग्णालयात उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातले ५० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा सध्यातरी सुरळीत असल्याचे तेथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब सगरे यांनी सांगितले आहे.
कळंबणी उपजिल्हा रुग्णालय हे खेड, दापोली आणि मंडणगड या तीन तालुक्यांचे कोविड हॉस्पिटल असून, आज त्या ठिकाणी ५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर याच रुग्णालयांतर्गत लवेल येथील कोविड केअर सेंटरमध्ये ७५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. ड्युरा सिलिंडर ऑक्सिजन प्रणाली उपलब्ध झाली नसती तर आज या रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासून रुग्णांचे मोठे हाल झाले असते, यात शंका नाही.