रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या लाॅकडाऊन काळात गरजू लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी अनाथ मुले आणि निराधार व्यक्ती यांच्यासाठी कार्यरत असलेली माहेर संस्था मदतीसाठी पुढे आली आहे.
सध्या लाॅकडाऊनची जिल्हा प्रशासनाकडून काटेकाेरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे सारे व्यवसाय बंद आहेत. केवळ दूध, भाजीपाला तसेच फळे यांची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू आहेत. व्यवसाय बंद झाल्याने अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे आज प्रत्येकाला एकमेकांच्या सहकार्याची गरज आहे.
लाॅकडाऊन काळात सर्वच बंद असल्याने गरजू लोकांची मोठीच गैरसोय झाली असून त्यांच्या खाण्यापिण्याचेही हाल होत आहेत. तर काहींना निवारा मिळणे अवघड झाले आहे. अन्नधान्य, कपडालत्ता याबरोबरच रूग्णांना पुढील उपचारासाठी तातडीने दुसरीकडे हलविण्यासाठी ॲम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी माहेर संस्था सरसावली आहे.
आपल्या आजूबाजूला कुणीही वयोवृद्ध अथवा मुले मुली अशा गरजू व्यक्तींना यासाठी गरज लागल्यास हातखंबा येथील माहेर संस्थेकडे संपर्क करावा, असे आवाहन माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे तसेच अमित चव्हाण यांनी केले आहे.