मेहरून नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे ब्रेक लागलेली एस. टी. सेवा हळूहळू पूवर्वपदावर येऊ लागली आहे. लाॅकडाऊन काळात रत्नागिरी विभागातील ५० वातानुकूलित शिवशाही बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, अनलाॅकनंतर १० शिवशाही बसेस दापोली, खेड, चिपळूण आगारातून सुरू करण्यात आल्या असल्या तरी अन्य आगारातील शिवशाही बसेस मात्र अद्याप बंद आहेत.
मुंबई, बोरिवली, पुणे, कोल्हापूर मार्गांवर शिवशाही बसेस सोडण्यात येतात. या मार्गांवरील शिवशाही बसेसना चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवशाही शयनयान बससेवा उपलब्ध असली तरी कोरोनामुळे महामंडळाच्या सूचनेनुसार सर्व शिवशाही बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. अनलाॅकनंतर आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी मिळाल्यानंतर लालपरी सुरू करताना शिवशाही बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, दापोली, खेड व चिपळूण आगारातूनच शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. अन्य सहा आगारांतील शिवशाही बसेस बंद आहेत. परंतु, गणेशोत्सवात ग्रामीण, शहरी मार्गावरील वाहतुकीचा विस्तार करत असतानाच सर्व आगारातील बंद शिवशाही बससेवा सुरू करण्याचा निश्चय रत्नागिरी विभागाने केला आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबईतून जादा गाड्यांचे आगमन होत असतानाच, नऊ आगारांमधून परतीसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. १,११० गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असले तरी प्रवाशांच्या सोयीसाठी परतीसाठी मुंबई, बोरिवली मार्गावर वातानुकूलित शिवशाही बसेस सुरू करण्यात येणार आहेत.
शिवशाहीतून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी शिवशाही बसेस लवकरच कार्यान्वित होणार आहेत.
या मार्गावर सुरु आहेत शिवशाही
दापोली - मुंबई
चिपळूण - मुंबई
चिपळूण - पुणे
खेड - बोरिवली
दापोली - पुणे
गणेशोत्सवात अन्य आगारातील शिवशाही बसेस सुरू होणार आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या सूचनेनुसार कोरोना काळात वातानुकूलित शिवशाही बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. अनलाॅकनंतर तीन आगारांनी प्राधान्याने शिवशाही बसेस सुरू केल्या. परंतु, अन्य सहा आगारांतील शिवशाही बसेस गणेशोत्त्सवात सुरू करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी सर्व गाड्यांची दुरूस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी.
बसेसचे दरराेज सॅनिटायझेशन
कोरोनामुळे प्रवाशांच्या आरोग्य सुरक्षेसाठी प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शिवशाही नव्हे तर शहरी २८०, ग्रामीण मार्गावरील ३,२०० फेऱ्या सुरू आहेत. प्रत्येक आगारात सॅनिटायझेशन सुविधा उपलब्ध आहे.