रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने वाहतुकीवर काहीअंशी अंकुश आलेला असला तरीही पेट्रोल आणि डिझेलचे दर भरमसाठ वाढू लागले आहेत. गेल्या आठवडाभरात पेट्रोल प्रति लीटर ७९ पैसे तर डिझेल प्रति लीटर ८७ पैशाने वाढले आहे. मात्र, या दरांवर नियंत्रण नसल्याने वाहनचालकांचे मात्र आर्थिक कंबरडे मोडले आहे. सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीचा आलेख वाढता असल्याने यावर सरकारचे नियंत्रण कधी येणार, असा प्रश्न उभा राहिला आहे.
गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर भरमसाठ वाढू लागले आहेत. १५ मे रोजी पेट्रोलचा दर १०० रूपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर ९० रूपये प्रति लीटर इतका होता. साधारणत: पुढच्या पंधरा दिवसांत हा दर कमी - जास्त होत होता. १ जून रोजी पेट्रोलचा दर प्रति लीटर १०२ रूपये १७ पैशांवर पोहोचला तर डिझेलचा दर ९२ रूपये ६९ पैशांवर गेला. गेल्या काही महिन्यांपासूून पेट्रोल - डिझेलच्या दरात लक्षणीय वाढ होत आहे.
दि. ४ जून रोजी पुन्हा पेट्रोलचा दर प्रति लीटर १०२ रूपये ४३ पैसे इतका झाला. म्हणजे तीन दिवसातच लीटरमागे २६ पैशांनी पेट्रोल महागले. ५ जून रोजी पुन्हा पेट्रोल आणि डिझेल दोन्हीही इंधनात पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोलचा दर प्रति लीटर १०२ रूपये ९६ पैसे इतका दर वाढला. म्हणजेच पेट्रोल पुन्हा ५३ पैशांनी वाढले तर डिझेलचाही दर ९२ रूपये ६९ पैसे इतका झाला आहे. म्हणजेच आठवड्यात तब्बल ८७ पैसे प्रति लीटर डिझेलचा दर वाढला आहे. सध्या कोरोनाच्या काळात रूग्णांची वाहतूक करण्यासाठी अथवा गंभीर रूग्णांना हलविण्यासाठी ॲम्ब्युलन्स अथवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, इंधन दरवाढीचा फटका या वाहतुकीलाही बसत आहे.
सध्या जिल्ह्यासह राज्यात लाॅकडाऊन सुरू आहे. काही जिल्ह्यांच्या सीमाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही या काळात पेट्रोल आणि डिझेल या इंधनात अधिकाधिक वाढ होऊ लागल्याने वाहनधारकांना वाहने चालविणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा चटका असह्य होऊ लागल्याने निदान आता तरी सरकारने त्यावर नियंत्रण आणायला हवे, अशा प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहेत.