रत्नागिरी : संरक्षण मंत्रालयाच्या भारतीय तटरक्षक रत्नागिरी कार्यालयातील विद्यमान कमांडिग ऑफिसर उपमहानिरीक्षक के. एल. अरुण यांची मुंबईतील भारतीय तटरक्षक जहाज संकल्प येथे कमांडिग ऑफिसरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी उपमहानिरीक्षक दुष्यंत कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असून, दिनांक २० जुलै २०२१ रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत.
मूळ केरळ येथील उपमहानिरीक्षक के. एल. अरुण यांना बदलीपश्चात मुंबईस्थित भारतीय तटरक्षक जहाज संकल्प येथे कमांडिग ऑफिसर पदी बढती देण्यात आली आहे. उपमहानिरीक्षक के. एल. अरुण हे दिनांक २८ जून २०२० पासून तटरक्षक अवस्थान रत्नागिरीच्या कमांडिग ऑफिसरपदी कार्यरत आहेत. या अल्पशा कार्यकालात त्यांनी जयगड येथे आणखी एका गस्ती जहाजाचे जलावतरण केले. त्याचबराेबर रत्नागिरी येथील कार्यालयीन इमारतीचे काम पूर्ण करणे, रत्नागिरी विमानतळ येथून विमान वाहतुकीसाठी आवश्यक एटीसी इमारतीच्या कामाचा शिलान्यास करणे, केंद्र सरकारच्या रिजनल एअर कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत रत्नागिरी विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्यासंदर्भात आवश्यक भूसंपादनसंदर्भात अतिशय महत्त्वाचा पुढील टप्पा गाठणे, कार्यालयीन आस्थापना कामकाजाचे संगणकीकरण करणे यासारख्या बाबी पूर्ण केल्या. त्यांच्या कार्यकाळात रत्नागिरी येथे तटरक्षक दलाच्या सदनिका बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे, तर इतर विविध सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक १२ एकर भूखंडांच्या संपादनाचा प्रस्तावही मंत्रालयात मंजुरीसाठी सादर केला आहे.