सकाळी लवकर म्हणजे पहाटे पाच वाजता निघायचे असल्याने आम्ही मुलेही लवकरच झोपी जायचो. तेव्हा टीव्ही, मोबाईल नसल्याने जागरणाचा प्रश्न नव्हता. सकाळी घरात न्याहरी बनवण्याची लगबग असे. आम्ही मुले उठलो की एकमेकांना हाका मारून जागे करायचो. वाड्याकडे जाताच बैलांना समजायचे आता आपले मजेचे दिवस संपले, पुढे दोन महिने कामच करायचे. बरेच दिवस कामाची सवय नसल्याने ते पण टोलवाटोलव करत. मग त्यांच्या शिंगात जुपण अडकवून आमच्या हातात टोक. पुढे नांगर, मध्ये बैल आणि आम्ही, मागोमाग न्याहरीवाल्या, ठेंगरे, कुदळ घेऊन बायामाणसे. जवळपास तासभर चालून खरी यायची. मग जोखडाखाली घालताना बैलांची मस्ती. सुरुवातीला जोत रुळावर यायला थोडा वेळ लागे. मध्येच वरा सोडून बैल आम्हाला दुसरीकडे ओढत नेत, मागोमाग दुसरे जोत पण बाहेर पडे. त्यांना पुन्हा मळीत आणायला सगळेच चार बाजूंनी जात. तेव्हा जोत धरणाऱ्या आमची फरपट होई. कारण बैलांच्या, जोतयाच्या (नांगर धरणारा) पायाला नांगराचा लोखंडी फाळ लागणार नाही, नांगर मोडणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागायची.
आमच्या खऱ्या म्हणजे अधेमध्ये अर्धा फूट जमीन नाहीतर सर्व कातळच. नांगरणी जपून करावी लागे. खडखड करत कधी क..... कट्ट होईल, याचा नेम नसे. जोडीला अधिकचा नांगर असे आणि मेस्त्री पण, चुलते कृष्णाआबा. त्यामुळे आम्हा लहानग्यांना (मी, भाऊ सुभाष, किरण, किशोर, विशाल) नांगर तुटला तरी चिंता नसे.
भात पेरून नांगरणी, कोपरे खणणे, ढेकळे फोडणे, जमीन सारखी करणे आदी कामात वेळ कधी जायचा कळायचे नाही. जोरात भूक लागे. मग भाकरी, सुकट, कोलीम पानावर घेऊन बांधावर बसून खाण्याची मौज न्यारीच म्हणायची. सूर्योदयाच्या अगोदर सुरु झालेले काम उन्हे डोक्यावर आली की सकाळ सत्रातले काम संपे. दुपारी विश्रांती झाल्यावर पुन्हा संध्याकाळी दुसऱ्या खरीत. जवळजवळ १०-१२ दिवस आम्ही एकमेकांना मदत करून सर्वांची धुरळेवाफ पूर्ण करून द्यायचो. जसे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आले तसे बघताबघता सारे बदलले. गोठे, शेते ओस पडली. माणसामाणसात दुरावा वाढला. जो तो तुझे तू - माझे मी यात अडकू लागला. पण गेल्यावर्षी अचानक आलेल्या कोरोनाच्या आपत्तीने पुन्हा एकदा माणुसकी ओसंडून वाहायला लागली. शेती हाच आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, कोणतेही काम हलके नाही आणि जाताना कोणी काहीही नेणार नाही, मानवी देह नश्वर आहे, याची तीव्रतेने सर्वांना जाणीव झाली.
धुरळेवाफ करताना आम्ही जसे एकमेकांच्या मदतीला धावून जायचो, त्या माणुसकीची आठवण कोरोना काळात ताजीतवानी झाल्याचे पाहून मनस्वी समाधान वाटते. आपल्यालाही कोणाची तरी गरज आहे, हे तितकेच शाश्वत आहे, नाही का?
- सुहास वाडेकर, हर्चे, लांजा