रत्नागिरी - राज्यातील विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच, कोकणातही पावासामुळे जनजीवन काहीप्रमाणात विस्कळीत झाल्याचे दिसून येते. रत्नागिरी जिल्ह्यातही गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रभर संततधार कायम ठेवली होती. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर येथे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या पूरस्थितीही आपले कर्तव्य बजावण्यासाठी वायरमनने पूराच्या पाण्यातून मार्ग काढला.
पाऊस आणि एमएसईबीची लाईट यांचं वेगळंच नातं आहे. पावसाला सुरु झाली, आकाशात वीजा कडाडल्या की इकडे लाईट गेली म्हणून समजा. अनेकदा वादळी वाऱ्यामुळे तारेवरील लूज कनेक्शन, डीपी जळणे किंवा इतर कारणांस्तव वीजप्रवाह खंडीत होतो. अशावेळी वायरमन जीवाची बाजी लावून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी काम करत असतात. राजापूर तालुक्यातील वायरमनंचं याच कारणामुळे कौतुक होत आहे. येथील वीजवितरण विभागाचे सहाय्यक अभियंता सी.एस. चिवटे, वायरमन संदेश गुरव, किशोर चंदुरकर आणि रमेश केंगार यांनी पुराच्या पाण्यामध्ये पोहत जाऊन शहरातील वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात महत्वाचं योगदान दिलं.
पायाला दोरी बांधून उतरले पाण्यात
शहरातील मच्छी मार्केट परिसरातील वीजपुरवठा सोमवारी सायंकाळी खंडीत झाला होता. त्यामुळे त्या परिसरातील पुराच्या पाण्याखाली असलेल्या डीपीच्या ठिकाणी जाऊन बिघाड झालेल्या लाईनची दुरूस्ती करणे गरजेचे होते. या परिसरात पुराचे पाणी असल्याने तेथे सहजासहजी जाणे शक्य नव्हते. पण लाईनची दुरूस्तीही करणे गरजेचे होते. अशा स्थितीमध्ये चिवटे आणि गुरव एकमेकांच्या पायाला दोरी बांधून पोहत पाण्याखाली असलेल्या डिपीच्या ठिकाणी पोचले आणि तेथील बिघाड काढत पुरवठा पूर्ववतपणे सुरू केला. वायरमन केंगार यांनीही रात्री उशीरा कोंढेतड परिसरातील वीजपुरवठा अशाच प्रकारे सुरू केला.