खेड : अतिवृष्टीमुळे शहरात आलेल्या महापुराने खेड बाजारपेठेसह नागरिकांचे माेठे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर आमदार याेगेश कदम यांनी ‘कर्तव्यरुपी मदत’ देण्यास सुरूवात केली आहे. शहरातील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आमदार योगेश कदम यांनी सांगितले.
पुराचे पाणी ओसरल्यानंतर ७२ तास उलटूनही व्यापारी व नागरिक स्थिरस्थावर झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर आमदार योगेश कदम यांनी आपद्ग्रस्त कुटुंबाना २५ जुलैपासून अन्नधान्य, कपडे व पिण्याचे बाटलीबंद पाणी यांचे वाटप करण्यास पुढाकार घेतला आहे. शहरातील साठी मोहल्ला, वालकी गल्ली, गुजर आळी, पाैत्रिक मोहल्ला, कासार आळी, बाजारपेठ आदी भागात अत्यावश्यक वस्तूंचे किट तयार करून त्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार योगेश कदम यांनी महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानबाबत नागरिकांकडून माहिती घेतली. तसेच कोणत्याही प्रकारची मदत आवश्यक असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन आपद्ग्रस्त नागरिकांना केले. महापुरात २७ तास बाजारपेठेसह जगबुडी नदी किनाऱ्यालगतची नागरी वस्ती पुराच्या पाण्यात होती. या कालावधीत आमदार कदम यांनी पाच अतिरिक्त बोटी दाभोळ व हर्णै येथून मागवून सुमारे २२५ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची कामगिरी केली. सद्यस्थितीत नागरिकांनी घरांची साफसफाई करून घेतली असली, तरी जीवनावश्यक वस्तूंची नासधूस झाल्याने अडचणींत वाढ झाली होती. मात्र, राज्य युवा सेना कार्यकारिणीचे सदस्य सिद्धेश कदम यांनी खेड शहर व तालुक्यातील इतर पूरग्रस्त गावातील आपद्ग्रस्तांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
---------------------------
खेड शहरातील नागरिकांना शासकीय मदत जास्तीत जास्त मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, महापुरात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना स्वखर्चाने काही जीवनावश्यक वस्तू व पिण्याचे पाणी घरपोच देण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पंचनामे लवकरात लवकर पूर्ण केले जातील.
- योगेश कदम, आमदार
-------------------------------
खेड शहरातील पूरग्रस्त भागातील कुटुंबांना आमदार योगेश कदम यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.