लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : सतत प्रवाशांच्या संपर्कात येत असल्यामुळे खरे कोविड योध्दे असलेले एस. टी.चे चालक, वाहक लसीकरणापासून अद्याप वंचित आहेत. मात्र, कर्तव्याला प्राधान्य देत मुंबईसह लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागातील ड्युटी बजावत आहेत.
गतवर्षी कोरोनामुळे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यावेळी एस. टी.चे चालक व वाहक बेस्टच्या मदतीला धावून गेले होते. अनलाॅकनंतर टप्प्याटप्प्याने एस. टी. वाहतूक शासनाच्या परवानगीनंतर सुरू झाली. कोरोना काळात एस. टी.च्या उत्पन्नावर परिणाम झाला. मात्र, खडतर प्रवासात चालक, वाहकांनी सेवा बजावली होती. मुंबईतून आलेल्या चालक, वाहकांची कोरोना तपासणी करण्यात येत होती. काहीजण कोरोना बाधित झाले होते. मात्र, योग्य उपचारानंतर बरे होऊन पुन्हा सेवेत हजरही झाले होते.
कोरोना रूग्ण पुन्हा वाढू लागले असल्याने एस. टी.चे चालक, वाहक, कर्मचारी, अधिकारी कोरोना संक्रमित होऊ लागले आहेत. परंतु तातडीने उपचारासाठी दाखलही होत आहेत. सध्या मुंबई मार्गावरील एस. टी.ची प्रवासी वाहतूक ७० टक्के सुरू आहे. प्रवासी भारमान घटल्यामुळे रत्नागिरी विभागाकडून ३० टक्के वाहतूक बंद करण्यात आली आहे.
७० टक्केच वाहतूक सुरू
रत्नागिरी विभागातून मुंबई मार्गावर दररोज शंभर गाड्या धावत असतात. मात्र, भारमानाअभावी ७० टक्केच गाड्या सुरू आहेत. मंडणगड, चिपळूण, खेड, दापोलीतून मुंबईत गाड्या घेऊन थेट चालक, वाहक जातात. मात्र रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर येथील चालक, वाहकांची ड्युटी पेण किंवा महाडला बदलत असल्याने थेट प्रवास करणाऱ्यांची संख्या निम्मी आहे.
एस. टी.च्या प्रत्येक फेरीनंतर निर्जंतुकीकरण आवश्यक असून, ते सुरूही आहे. प्रवाशांना मास्क वापरण्यास सांगत असून, सॅनिटायझरचा वापरही प्राधान्याने करीत आहोत. सुरक्षित प्रवासी वाहतूक हे महामंडळाचे ब्रीदवाक्य असले तरी आमचे कर्तव्य आहे. कर्तव्याला प्राधान्य देत आम्ही सेवा बजावत आहोत. प्रवाशांशी सतत संपर्क येत असल्याने लसीकरणाचा विचार होणे आवश्यक आहे.
- संतोष शेट्ये, वाहक
प्रवाशांमधील संपर्कामुळे संक्रमणाचा धोका वाढतो आहे. परंतु महामंडळ सध्या खडतर प्रवास करीत असल्याने प्रवासी वाहतुकीसाठी आम्ही बांधिल आहोत. मुंबई गाडी घेऊन थेट जात नाही. महाड, पेण येथे ड्युटी बदलते. काही भागातून मात्र थेट वाहतूक होते. मुंबईसह अन्य मार्गावरील सेवा बजावताना, आरोग्याबाबत आम्ही दक्ष असल्याने आवश्यक ती काळजी घेत आहोत, शिवाय सहकाऱ्यांना सूचना करतो.
- मंगेश देसाई, चालक