रत्नागिरी : वर्षभर ज्याच्या आगमनाची आतुरता लागते त्या लाडक्या गणपतीबाप्पांच्या स्वागतासाठी अवघा भक्तगण आतूर झाला आहे. दहा दिवसांची प्रतिक्षा असली तरी लाडक्या बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. गणेश चतुर्थीच्या एक दोन दिवस आधी भाविक गणेश मूर्ती घरी नेण्यात येत असल्याने गणेशमूर्ती शाळेत कामाची लगबग सुरू झाली आहे.थर्माकोल, प्लास्टिक बंदी असली तरी त्याला पर्यायी सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध असून विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. गणेशमूर्ती तयार करण्याच्या साहित्यापासून मखर, सजावटीचे तसेच पूजेच्या साहित्य खरेदी भाविकांनी सुरू केली आहे. घरगुती गणेशोत्सवापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते सरसावले आहेत. घरोघरीसुध्दा साफसफाई, रंगरंगोटीची तयारी सुरू झाली आहे. बाजारात कोल्हापूर, पेण येथून तयार गणेशमूर्ती विक्रीस आल्या आहेत. अगदी पाच इंचापासून तीन, चार फूटी मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गणेश मूर्तीशाळेतील मूर्तीकारांची सर्वाधिक घाई सुरू आहे. वेळेत काम पूर्ण करण्यासाठी रात्रपाळी करण्यात येत आहे. गावामध्ये पाट नेवून द्यायची पध्दत आहे. तयार गणेशमूर्तीना वाढती मागणी आहे. पाचशे रूपयांपासून सहा, सात हजारापर्यत मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इंधनाचे दरातील वाढ शिवाय माती, रंगाचे दरात वाढ झाली आहे. मजूरीही वाढली असल्याने मूर्तीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी गणेशमूर्तींच्या किंमतीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.गणेशमूर्ती तयार करताना कोरीव, रेखीव काम असल्याने रंगकामासाठी वेळ लागत आहे. वेळेत रंगकाम आवरण्यासाठी माणसांची कमतरता भासत असल्याने कुटूंबातील सर्व सदस्य कामात व्यस्त झाले आहेत.
गणपतीबाप्पांच्या आगमनाची आतुरता, रत्नागिरीत मुर्तीकारांमध्ये कामाची लगबग
By मेहरून नाकाडे | Published: September 09, 2023 4:17 PM