रत्नागिरी : जिल्हा परिषदेत सव्वा वर्षाची मुदत पूर्ण झालेली नसली तरी पदाधिकारी बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे आतापासूनच काहींनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.रत्नागिरीजिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. या ५५ पैकी ३९ सदस्य शिवसेनेचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ सदस्य आहे. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीतील घडामोडींमुळे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर समर्थक ६ सदस्य आहेत. ते राष्ट्रवादीकडून निवडून आलेले असले तरी मनाने शिवसेनेबरोबर आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये आता विरोधक आहेत की नाही, असा प्रश्न पडतो.
सध्या जिल्हा परिषद अध्यक्षपदी रोहन बने असून अध्यक्षपद सर्वसाधारण (खुला गट) मध्ये आहे. तर उपाध्यक्षपदी गुहागरचे महेश नाटेकर, शिक्षण सभापतीपदी खेडचे सुनिल मोरे, समाजकल्याण सभापतीपदी रत्नागिरीच्या ऋतुजा जाधव, बांधकाम व आरोग्य सभापतीपदी रत्नागिरीचे बाबू म्हाप, महिला व बालकल्याण सभापतीपदी संगमेश्वरच्या रजनी चिंगळे हे सध्या कार्यरत आहेत.ज्या सदस्यांना जिल्हा नियोजन समितीवर संधी देण्यात आलेली आहेत त्यांना परिषदेची अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विषय समित्यांच्या सभापती पदी निवडीच्या वेळी त्यांचा विचार होणार नाही, असा शिवसेनेच्या वरिष्ठ स्तरावर निर्णय झालेला आहे. दरम्यान, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतीपदांसाठी शिवसेनेमध्ये ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षासाठी संधी देण्यात येते. त्यामुळे रोहन बने आणि इतर सभापतीपदांच्या निवडीनंतर अजूनही मुदत पूर्ण झालेली नाही. या सर्वांना मार्चमध्ये सव्वा वर्षे पूर्ण होणार आहेत.
या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर दोन महिन्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात झाल्याने त्यांना विकास कामे करताना मोठी अडचण निर्माण झाली होती. तरीही अध्यक्ष रोहन बने व अन्य पदाधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे.दरम्यान, अध्यक्ष बने यांची अजूनही दोन महिन्याची मुदत असतानाही लवकरच नवीन पदाधिकारी जिल्हा परिषदेत येणार, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. अध्यक्षपदासाठी जेष्ठ सदस्य व गटनेते उदय बने यांच्या नावाची चर्चा सुरु असली तरी माजीमंत्री रामदास कदम यांचे बंधू व माजी सभापती अण्णा कदम हेही या शर्यतीत आहेत.
तसेच आमदार भास्कर जावध यांचे चिरंजिव राष्ट्रवादीचे गटनेते विक्रांत जाधव यांच्याही नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा सुरु आहे. मात्र, शिवसेनेकडे उमेदवार असताना सध्या राष्ट्रवादीमध्ये असलेल्या विक्रांत जाधव यांच्या नावाला पक्षाकडून पसंती दिली जाण्याबाबत शिवसेनेत शंका व्यक्त केली जात आहे. पदाधिकारी निवड अजून लांब असली तरी वातावरण मात्र तापू लागले आहे.हे आहेत चर्चेतलांजातील सदस्य चद्रकांत मणचेकर, सदस्या पूजा नामे, राजापूरच्या सदस्या लक्ष्मी शिवलकर, रत्नागिरीच्या सदस्या मानसी साळवी, सदस्य पर्शुराम कदम हे सभापतीपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, शिवलकर, साळवी यांच्याबद्दल पक्षामध्ये नाराजी आहे.असे झाले बदलराष्ट्रवादीचे १५पैकी ९ सदस्य शिवसेनेच्या तर काँग्रेसचा एकमेव सदस्य भाजपच्या पाठीशी आहे.