रत्नागिरी - विविध रंगांचे आणि विविध आकारातले मासे, विविध आकारांचे खडक आणि त्यावरील प्रवाळ असं समुद्राच्या पोटातलं अनोखं जग साऱ्यांनाच भुरळ घालतं. आता रत्नागिरीतील समुद्राच्या पोटातलं हे विश्वही तुम्हाला पाहता येईल.
रत्नागिरीतील हर्षा स्कुबा डायव्हींगतर्फे मिऱ्या समुद्रकिनारी हा उपक्रम सुरू झाला आहे. नाताळच्या सुट्टीत प्रायोगिक स्तरावर राबवलेल्या या उपक्रमाला पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे आता हा उपक्रम नियमित पद्धतीने सुरू झाला आहे.समुद्र हे साऱ्यांचेच आकर्षण आहे. त्यात समुद्राच्या पोटात डोकावण्याचा आनंद वेगळाच आहे आणि पर्यटक तो एन्जायही करत आहेत,असे हर्षा स्कुबा डायव्हींगचे सुहास ठाकुरदेसाई, कौस्तुभ सावंत आणि महेश शिंदे यांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मान्यताप्राप्त संस्थेतून डायव्हींगचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले सहाजण येथे कार्यरत आहेत. एकावेळी पाचजणांना पाण्याखाली नेले जाते आणि प्रत्येक पर्यटकासोबत एक तज्ज्ञ मार्गदर्शक सोबत दिला जातो.
साधारण २० मिनिटे पाण्यातील हे जग पाहता येते. साहसी पर्यटनाला मुळातच पर्यटकांची पसंती असते. आता सागरी साहसी पर्यटनामुळे रत्नागिरी हे पर्यटकांसाठी महत्त्वाचे डेस्टनेशन बनेल, असा विश्वास कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकुरदेसाई यांनी व्यक्त केला.कोकणात आतापर्यंत केवळ तारकर्ली (मालवण) येथे स्कुबा डायव्हींग उपलब्ध होते. आता रत्नागिरीतही ते उपलब्ध झाल्यामुळे पर्यटनाला हातभार लागेल. येथेच आता नाईट स्कुबा डायव्हींग, वॉटर स्पोर्टस् असे उपक्रमही येथे राबवले जाणार आहेत.