मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे वायव्य मुंबईतील उमेदवार अमोल गजानन कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही तासातच ईडीने नोटीस बजावली आहे. मुंबई महापालिकेतील बहुचर्चित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून, काही अधिकारी कीर्तीकर यांच्या दापोलीतील बंगल्यावर दाखल झाले आहेत.
बुधवारी सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये वायव्य मुंबईसाठी अमोल कीर्तीकर यांचे नाव घोषीत झाले. त्यानंतर काही तासातच कीर्तीकर यांना ईडीने नोटीस बजावली आहे. कोरोना काळात मुंबई महापालिकेने स्थलांतरित परप्रांतीयांना डाळतांदळाची खिचडी दिली होती. या खिचडी वाटपात मोठा गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. मुंबई पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात यामध्ये सहा कोटींहून अधिक घोटाळा झाला असल्याची माहिती पुढे आली.
आता याच प्रकरणात ईडीने अमोल कीर्तीकर यांना नोटीस बजावली आहे. बुधवारी सकाळी ही नोटीस बजावण्यात आल्यानंतर दापोली तालुक्यातील शिर्दे या गावातील त्यांच्या बगल्यावर ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या उमेदवाराची चौकशी होत असल्याने सर्वत्र त्याची चर्चा सुरू आहे. अमोल कीर्तीकर हे शिवसेनेतील जुने नेते गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव आहेत. गजानन कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत कले आहे. अमोल कीरय्तीकर मात्र अजूनही ठाकरे शिवसेनेतच आहेत.