मागणीत घट झाल्यामुळे परिणाम, अजून दर कमी होण्याची शक्यता
मेहरुन नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेल्या आठवडाभरात खाद्यतेलाच्या दरात लीटरमागे १५ रुपयांची घट झाली आहे. गणेशोत्सवापर्यंत खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ सुरूच होती. वाढत्या दरामुळे तेलाच्या मागणीवर परिणाम झाला असल्याने दरात घट झाली आहे. येत्या १५ दिवसात आणखी दर खाली येणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
घाऊक बाजारातच तेलाच्या किमतीत घट झाली आहे. वास्तविक गेले वर्षभर तेलाच्या किमतीचा आलेख उंचावतच राहिला. त्यामुळे ग्राहकांनीही खाद्यतेल वापरात काटकसर सुरू केली आहे. मात्र, दसरा-दिवाळी समीप असून, तेलाचे दर खाली आले तर नक्कीच ग्राहकांना सणासुदीचा गोडवा साजरा करता येईल.
किराणा खर्चात बचत
गेले वर्षभर खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले होते. वास्तविक दिवाळीपासूनच दरात वाढ सुरू होती. गणेशोत्सवातही खाद्यतेलाचे दर भडकलेलेच होते. मात्र गेल्या आठवड्यापासून तेलाच्या किमतीत काही प्रमाणात घट झाली आहे. दरात घट झाल्यामुळे नक्कीच किराणाच्या खर्चात काही प्रमाणात बचत होईल.
- मयुरी चव्हाण, रत्नागिरी
खाद्यतेल, डाळी, तांदूळ, कडधान्यांच्या किमतीत वर्षभर सातत्याने वाढ सुरू होती. तुलनेने खाद्यतेलाच्या किमतीत दरवाढ अधिक होती. मात्र लीटरमागे १५ रुपयांची झालेली घट नक्कीच फायदेशीर आहे. अजून किमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बजेटची कोलमडलेली गाडी रुळावर येईल.
- अनघा कुंभार, लांजा
खाद्यतेलाच्या किमतीतील सातत्यपूर्ण वाढीमुळे मागणीवर परिणाम झाल्यानेच घाऊक बाजारातील किमतीत घट झाली आहे. किलोमागे १५ रुपये गेल्या आठवडाभरात कमी झाले. येत्या पंधरा दिवसात आणखी काही दर खाली येण्याची शक्यता आहे. दरात घट झाली तर नक्कीच खाद्यतेलाच्या मागणीत वाढ होईल.
- आसिफ मेमन, रत्नागिरी