लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : शासनाच्या ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे रेंजअभावी मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. या पध्दतीत बदल करण्याची मागणी प्रकाश गुरव यांनी केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ज्या ठिकाणी कोविडचा प्रादुर्भाव नसेल, त्या ठिकाणी पालकांच्या सहमतीने शिक्षकांना वा स्वयंसेवकाची निवड करून शिक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
पंचायत समितीची मासिक सभा सभापती प्रमिला कानडे यांच्या अध्यक्षतेखाली सहायक गटविकास अधिकारी तेजश्री आवळे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी सर्व सदस्य, सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शिक्षण विभागाकडून सुगम, दुर्गम शाळांची करण्यात आलेली निवड ही चुकीची असून, दुर्गम असलेल्या शाळांचा समावेश सुगम शाळांमध्ये करण्यात आला असल्याची बाब अभिजित तेली यांनी उघड केली. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या सुगम दुर्गममुळे शिक्षक कमी झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न यावेळी तेली यांनी उपस्थित केला.
तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोहाेचत नाहीत. तालुक्यामध्ये बसविण्यात आलेली पर्जन्यमापके ही सदोष असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर्षी आंबा हंगाम वाया गेल्याने असलेल्या सर्व बागायतदारांना पीकविम्याचा लाभ मिळावा, तालुका कृषीकडून शेतकऱ्यांसाठी सबसीडीवर खते उपलब्ध करून मिळावीत, अशी मागणी यावेळी अभिजित तेली यांनी केली.
तालुक्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणाखाली येत असल्याची माहिती यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ़. परांजपे यांनी दिली, तर जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत, अन्याय केला जात असल्याची खंत बाजीराव विश्वासराव यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा पातळीवर मागणी करूनही रुग्णवाहिका मिळत नसल्याने जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देता आली नाही. उपलब्ध होताच त्वरित दिली जाईल, अशी ग्वाही डाॅ. परांजपे यांनी दिली. तसेच तालुक्यामध्ये २९ ठिकाणी विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. तालुक्यामध्ये म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण नसल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
म्युकरमायकोसिसचा आजार वेगाने वाढत असल्याने तालुक्याच्या ठिकाणी या रोगावर उपचार सुरू करण्यासाठी स्वतंत्र वाॅर्ड सुरू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत रिक्त असलेल्या पदाची माहिती प्रभारी अधिकारी सौ. प्रगती लिगम यांनी दिली असून या रिक्त पदाला मंजुरी मिळावी म्हणून जिल्हा परिषद महिला-बालकल्याण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे सांगितले.
--------------------
सदस्य विरुद्ध आगारप्रमुख जुगलबंदी
एस.टी. महामंडळाचा विषय सुरू होताच एकच गदारोळ सुरू झाला. सर्व सदस्य एका बाजूला, तर आगारप्रमुख राजेश पाथरे एका बाजूला, अशी जुगलबंदी जुंपली होती. दोन्ही बाजू आपले म्हणणे खोडून काढू देत नव्हत्या. अखेर काही सदस्यांमधून शासनाच्या आदेशानुसार तालुक्यातील सर्व एस.टी. फेऱ्या सुरू कराव्यात, अशी सूचना करीत या विषयावर पडदा टाकला.