मुस्लिम समाजातील गोरगरीब विद्यार्थिनींना शिक्षणाची कवाडे उघडण्याच्या हेतूने ईस्माईल हकीम यांनी काही शिक्षणप्रेमींच्या सहकार्याने ‘आयडियल एज्युकेशन सोसायटीची’ स्थापना १९६६ साली केली. केवळ १६ ते १७ विद्यार्थिनींना घेऊन वर्षभरात संस्थेने आयडियल गर्ल्स सुरू केले. सावित्रीच्या लेकींसाठी ही शाळा प्राधान्याने सुरू करण्यात आली. तत्कालीन अध्यक्ष ईस्माईल हकीम व उद्योजक एम. डी. नाईक यांनी समाजातील मुलींना शिक्षित करण्याचा जणू चंग बांधला होता. त्यामुळे कमी संख्या असली, तरी समाजातील लोकांचे प्रबोधन करून शाळेचे कामकाज सुरू ठेवले. १९७९ मध्ये ‘बेगम अजिजा दाऊद नाईक गर्ल्स हायस्कूल’ असे शाळेचे नामकरण करण्यात आले. शाळा सुरू तर केली परंतु प्रश्न होता जागेचा? हकीम, नाईक या द्वयींनी शाळेचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या आठ वर्षात शाळेच्या नूतन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. दिनांक २ आॅक्टोबर १९८७ रोजी शाळा स्वमालकीच्या इमारतीत भरू लागली. जिल्ह््यातील उर्दू माध्यमाची पहिली मुलींची शाळा म्हणून पालकांची पसंती अधिक होती. परंतु, शासनाच्या नियमानुसार पुरेशी पटसंख्या नसल्यामुळे मुलींसह मुलांनाही शाळेत प्रवेश सुरू केला. पुढे दोन वर्षातच दिनांक १८ फेब्रुवारी १९८९ रोजी शाळेचे पुन्हा ‘बेगम अजिजा दाऊद नाईक हायस्कूल’ असे नामकरण करण्यात आले. या शाळेत मुले-मुली एकत्र शिकू लागली.आज शाळेमध्ये के. जी.पासून दहावीपर्यंत एकाच शैक्षणिक संकुलात १७६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेने सेमी इंग्रजीतूनही अध्यापन सुरू केले आहे. शाळेने विविध शैक्षणिक उपक्रमांबरोबर अभ्यासातही दर्जा राखला आहे. दहावीचा शंभर टक्के निकाल ही शाळेची खासियत आहे. बदलत्या तंत्राचा अवलंब करत शाळेत ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अद्ययावत संगणक कार्यशाळा, ‘सायन्स’ प्रॅक्टीकल रूम स्वतंत्र आहेत. शाळेने विद्यार्थ्यांसाठी व्यायामशाळा सुरू केली आहे. शाळेतच विद्यार्थ्यांसाठी अल्प दरात उपाहारगृह चालविण्यात येते. शाळेचा स्वतंत्र कॅम्पस असून, शाळेने सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले आहेत. यातून शाळा व आवार यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. शाळेची शिस्त व अध्यापनातील दर्जा यामुळे पालकांचा या शाळेकडे ओढा अधिक आहे. जिल्ह््यातील उर्दू माध्यमाची मोठी शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जाते. शैक्षणिक दर्जा उंचावतानाच शासकीय चित्रकलेच्या ग्रेड परीक्षा, संगणक, विज्ञान, भाषा, गणित तसेच विविध शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे विद्यार्थी यश संपादन करत आहेत. क्रीडा क्षेत्रातही शाळेने स्वत:चे वेगळेपण जपले आहे. व्हॉलीबॉलचा मुलींचा संघ दरवर्षी ‘चॅम्पियनशीप’ मिळवत आहे. याशिवाय स्काऊट गाईड, विज्ञान प्रदर्शनातही शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला आहे. प्रजासत्ताक दिनी शाळा संचलनात सहभागी होते. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून समस्त रत्नागिरीकरांची वाहवा मिळवते. संस्थेने सर्वसामान्यांसाठी ही शाळा सुरू केली आहे. त्यामुळे ‘गरीब विद्यार्थी फंड’ गोळा केला जातो. या फंडमधून दरवर्षी १५० विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, २०० विद्यार्थ्यांना वह्यावाटप इतकेच नव्हे तर मुलांना मोफत प्रवासी पासही उपलब्ध करून दिले जातात. शहराच्या मुख्यवस्तीपासून शाळा आत असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शहरी बस वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.विविध शासकीय उपक्रमांमध्ये शाळेचा नित्य सहभाग असतो. शाळेने साने गुरूजी गुणवत्ता विकास अभियानात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच याच अभियानात शाळेला विशेष दर्जा देखील प्राप्त झाला आहे.बदलत्या काळानुरूप पालकांच्या आग्रहास्तव व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी संस्थेने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली होती. नर्सरी व के. जी.चे दोन वर्ग तसेच प्राथमिकचे चार वर्ग संस्थेतर्फे सुरू करण्यात आले होते. परंतु, शासकीय मान्यतेअभावी हे वर्ग बंद करण्यात आले. शिक्षण विभागाच्या अटी व शर्तींची पूर्तता करून भविष्यात पुन्हा इंग्रजी माध्यमाची शाळा संस्थेतर्फे नव्याने सुरू करण्यात येणार आहे. दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाचा उद्भवणारा प्रश्न व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय, पालकांना बसणारा आर्थिक भुर्दंड याचा विचार करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संस्थेने कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच शिक्षण विभागाच्या मान्यतेने संस्था कनिष्ठ महाविद्यालयही सुरू करणार आहे. विद्यार्थ्यांची गरज व बदलत्या काळानुरूप संस्थेने योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्याने ही शाळा नेहमीच प्रगतीपथावर राहिली आहे. शाळेने आजपर्यंत विनाखंड आपल्या यशाचा आलेख उंचावत ठेवला आहे.- मेहरुन नाकाडे, रत्नागिरीजिल्ह्यातील उर्दू माध्यमांची मोठी शाळा म्हणून आयडियल एज्युकेशन सोसायटीच्या बेगम अजिजा दाऊद नाईक हायस्कूलला ओळखले जाते. संस्थेने एकाच शैक्षणिक संकुलांतर्गत के. जी.पासून दहावीपर्यंतचे वर्ग सुरू केले आहेत. संस्थेने इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू केली होती. के. जी. ते प्राथमिक शाळेचे वर्ग सुरु होते. मात्र, शासकीय मान्यता न मिळाल्याने हे वर्ग बंद करण्यात आले. तरी भविष्यात संस्थेचा इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा मानस आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयही सुरू करण्यात येणार आहे.- रफीकशेठ नाईक, अध्यक्ष, आयडियल एज्युकेशन सोसायटी, रत्नागिरी.
विद्यार्थिनींसाठी उघडली शिक्षणाची कवाडे
By admin | Published: March 17, 2016 11:03 PM