वाटूळ : मागील दोन वर्षांपासून निवेदने, चर्चा आदी माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करूनही जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांसाठी शिक्षण क्रांती संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे १५ ऑगस्टला शिक्षणाधिकारी कार्यालयासमाेर उपाेषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत शिक्षण क्रांती संटनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात लहान-लहान चुका दाखवून प्रस्ताव जाणीवपूर्वक फेटाळले जात असल्याचा आराेप करण्यात आला आहे तसेच शिक्षकांना कार्यालयातून मिळणारी उडवाउडवीची उत्तरे, प्रलंबित निवड श्रेणी, वरिष्ठ वेतनश्रेणी, मुख्याध्यापक स्वाक्षरी अधिकार अशा तेरा महत्त्वाच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना जिल्हा शाखेतर्फे १५ ऑगस्टला शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपाेषणाला बसणार आहे. याबाबत संघटनेचे कोकण विभागाध्यक्ष रमेश जाधव, जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, सचिव राहुल सप्रे, रत्नागिरी तालुका अध्यक्ष महेंद्र कुवळेकर, सचिव धनाजी पाटील यांनी निवेदन देत माहिती दिली आहे.