संकेत गाेयथळे
लोकमत न्यूज नेटवर्क
गुहागर : आपल्या देशातील शिक्षण पद्धतीही जागतिक स्तरावरील शिक्षण पद्धतीचा विचार करता प्राथमिक स्तरावर आहे. देश पातळीवर याचा गांभीर्याने विचार करून शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होणे गरजेचे आहे, असे मत मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेशन एक्सपर्ट पुरस्कार प्राप्त मयुरेश माने यांनी व्यक्त केले.
प्रश्न : पुरस्कारासाठी काेणती तयारी केली?
उत्तर : मायक्रोसॉफ्टतर्फे या पुरस्कारासाठी आपण ऑनलाइन प्रथमच अर्ज केला होता. यासाठी मृणाल गांजाळे यांनी मार्गदर्शन केले. पहिल्यांदा नाॅमिनेशन फॉर्म भरण्याबरोबरच यासाठी आवश्यक कोर्सेस करावे लागले. त्यानंतर आवश्यक बॅच मिळाला व पुढे नाॅमिनेशनसाठी नाव जाहीर झाले.
प्रश्न : काेणकाेणत्या देशांशी तुमचा संपर्क आला?
उत्तर : ऑनलाइन पद्धतीने रशिया, अमेरिका आणि विविध देशातून शिक्षक तसेच विद्यार्थी यांच्याशी संपर्क साधला. या देशातून असलेली शिक्षणाची वेगळ्या पद्धती व भारतातील शिक्षण पद्धती शैक्षणिक प्रश्न यावर चर्चा करण्यात आली.
प्रश्न : अन्य देशांच्या तुलनेत आपली शिक्षण पद्धती कशी वाटली?
उत्तर : अन्य देशांशी चर्चा केल्यानंतर भारतातील शिक्षण पद्धती ही इतर देशांच्या तुलनेत अद्यापही प्राथमिक स्तरावर असल्याचे जाणवले. यामध्ये मोठे बदल होण्यासाठी देशपातळीवर शिक्षण पद्धती विषयी गांभीर्याने लक्ष देऊन निर्णय घेण्याची गरज आहे.
प्रश्न : आपल्याकडील शिक्षणातील नेमकी त्रुटी काय जाणवते?
उत्तर : आपल्या शिक्षण पद्धतीत भौतिक सुविधा दिल्या जातात. आजही देशात शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त अनेक कामे दिली जात असल्याने शिक्षक आवश्यकता पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकत नाही. अनेक शाळांतून एका वर्गातून ६० विद्यार्थी असतात. मात्र, इतर देशातून एका वर्गात २५ पेक्षा जास्त विद्यार्थी घेत नाहीत व प्रत्येक विषयासाठी वेगळा शिक्षक देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.
प्रश्न : शिक्षण पद्धतीत बदल हाेणे गरजेचे आहे का?
उत्तर : नक्कीच. हा बदल झाल्याशिवाय शिक्षण क्षेत्राचा दर्जा सुधारणा नाही.
अध्यापन कार्यात नावीन्यता
मयुरेश माने यांनी मायक्रोसॉफ्टच्या विविध टूल्सच्या सहाय्याने तसेच स्काईपच्या मदतीने अध्यापन कार्यात नावीन्यता आणण्याचा प्रयत्न केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून या पुरस्कारासाठी तिघांची निवड झाली आहे. यामध्ये मयुरेश माने यांचा समावेश आहे. मयुरेश माने हे मूळचे गुहागरचे असून, चिपळूण तालुक्यातील रत्नसागर इंग्लिश स्कूल दहिवली येथे शिक्षक आहेत. अध्यापनात नावीन्यता आणण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असताे.
गेस्ट लेक्चरर म्हणून संधी मिळेल
हा पुरस्कार प्राप्त झाल्याने पुढील काळात मायक्रोसॉफ्ट म्हणून जागतिक स्तरावर गेस्ट लेक्चरर तसेच विविध माध्यमातून काम करण्याची संधी मिळणार आहे. देशपातळीवर ४,४६० जणांना पुरस्कार मिळाले असून, रत्नागिरी जिल्ह्यातून तिघांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये रणजित देसाई - राजापूर तसेच सुलताना भाटकर - रत्नागिरी यांचा समावेश आहे.