जनावरांचा बंदोबस्ताची मागणी
खेड : शहरात जनावरांसह श्वानांचा उपद्रव वाढला आहे. जनावरे कळपाने मुख्य रस्त्यावर हिंडत असतात. दुचाकीस्वारांच्या मागे श्वान लागत असल्याने भीती निर्माण झाली आहे. भाजपतर्फे मोकाट जनावरे व श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली असून, निवेदन भाजपतर्फे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना देण्यात आले आहे.
हळद लागवडीस प्रारंभ
दापोली : तालुक्यातील दमामे, तामोंड, भडवळे या गावांमध्ये साजरा करण्यात आला. शेतकरी सहभागातून भात व हळद लागवड प्रात्यक्षिक घेऊन कार्यक्रम कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आला. बीज प्रक्रिया, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विजय पवार यांची निवड
रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या ६४ व्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ नुकताच झाला. यावेळी विजय पवार यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारून कामाला सुरुवात करत असण्याची घोषणा केली. कोरोना महामारीमुळे हा कार्यक्रम ऑनलाईन माध्यमातून करण्यात आला.
भातलागवड प्रात्यक्षिक
खेड : डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्णमहाेत्सवी वर्षानिमित्त कृषी महाविद्यालय, दापोलीच्या विस्तार शिक्षण विभागातर्फे उधळे (खेड) येथे ओळीमध्ये भातलावणी प्रात्यक्षिक घेण्यात आले. विस्तार शिक्षण विभागाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डाॅ. प्रवीण झगडे यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक सादर करून दाखविले.
प्रशालेस प्रिंटरची भेट
दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित ए. जी. हायस्कूलचा संगणक कक्ष असून ज्युनिअर काॅलेजचे सेवानिवृत्त शिक्षक प्रा. एम. जी. कुलकर्णी यांनी प्रशालेस दोन प्रिंटर भेट दिले. कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करून कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नीलिमा देशमुख, मुख्याध्यापक सतीश जोशी उपस्थित होते.
सामाजिक बांधीलकी
देवरूख : कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक मुलांनी आपले पालक गमावले आहेत.अशा मुलांच्या शिक्षणांसाठी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ व नेस्कस्ट जनरेशन फाऊंडेशन मदतीचा हात पुढे करणार आहे.तालुक्यातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यात येणार असल्याची माहिती दोन्ही संस्थांचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली.
स्मशानभूमीत वृक्षारोपण
दापोली : तालुक्यातील गिम्हवणे येथील देवळेवाडी स्मशानभूमीत वड, काजू, बकुळ, चाफा या प्रकारची झाडे लावण्यात आली. दापोली कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागातर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागप्रमुख डाॅ. प्रमाेद सावंत, कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा.प्रभाकर शिंदे आदी उपस्थित होते.
दुग्धजन्य उत्पादन सुरू करावे
साखरपा : केवळ दुधावर अवलंबून न राहता अन्य दुग्धजन्य उत्पादनांचाही विचार दूध उत्पादकांनी करावा, असा सल्ला जनता बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय सोलकर यांनी दिला, कनकाडी दूध डेअरीत ते दूध उत्पादकांशी बोलत होते. दुधापासून दुग्धजन्य उत्पादने, शेणापासून कंपोस्ट खतनिर्मिती, गांडूळ खतनिर्मितीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन केले.
बांधकाम साहित्य महागले
चिपळूण : कोरोनाकाळात उत्पादन शुल्क व मागणीत कोणतीही वाढ झालेली नसताना सिमेंट आणि स्टीलच्या दरात भरमसाठ वाढ होत आहे. गेल्या सहा महिन्यांत सिमेंटच्या दरात ४० टक्क्यांनी, स्टील दरात ५० ते ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बांधकाम शुल्कात २०० ते २५० प्रतिचाैरस फूट रुपयांची वाढ झाली आहे.