लोकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना आलेले शैक्षणिक साहित्य गेल्या तीन वर्षांपासून धुत्रोली येथील उर्दू शाळेच्या समूह साधन केंद्रांच्या इमारतीत धूळखात पडलेले असल्याची तक्रार मंडणगड तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष रघुनाथ पोस्टुरे यांनी गटविकास अधिकारी मंडणगड यांच्याकडे ५ एप्रिल २०२१ रोजी केली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने तत्काळ पंचनामा करून संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
रघुनाथ पोस्टुरे यांनी केलेल्या तक्रारीनुसार एका बाजूला शाळा शालेय उठावाच्या माध्यमातून ग्रामस्थ व शिक्षणप्रेमींना आवाहन करून शैक्षणिक साहित्य मिळवत आहेत. तर दुसऱ्या बाजूला शासनाकडून मिळणारे शैक्षणिक साहित्य तीन वर्षे धूळखात पडले आहे. जिल्हा परिषदेतर्फे शाळांना सहशालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. क्लिष्ट विषयांची विद्यार्थ्यांना सोप्या पध्दतीने माहिती मिळावी याकरिता गणित, विज्ञान व इंग्रजी विषयाच्या माहिती साहित्याचा यात समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी शैक्षणिक साहित्याने भरलेल्या पत्र्याच्या मोठ्या ट्रंका मंडणगड तालुक्यातील शाळांना वितरीत करण्यासाठी शिक्षण विभागाचे ताब्यात देण्यात आल्या. या सर्व ट्रंका शिक्षण विभागाने धुत्रोली येथील उर्दू शाळेच्या परिसरातील रिकाम्या इमारतीत ठेवल्या. मात्र, त्या तीन वर्षांत वितरीत करण्यात आलेल्या नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तक्रारीच्या अनुषंगाने तालुक्यातील प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रशालेला शालेय कामकाजाच्या वेळेत भेट दिली असता प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी छायाचित्रे काढण्यास मज्जाव केला. या ट्रंका कोणी आणून ठेवल्या आहेत याविषयी त्यांनी माहिती दिली. मात्र, किती ट्रंका आणल्या याची आपणाकडे नोंद नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येथून गेलेल्या ट्रंकांची आपणाकडे नोंद असल्याची माहिती दिली. नोंद असलेले जावक रजिस्टर शिक्षण विभागाचे कार्यालयात जमा केलेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या संदर्भात अधिकची माहिती घेण्यासाठी तालुका शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात गेले असता शिक्षण अधिकारी सांगडे हे कामानिमित्त बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता हे सामान काेविडपूर्वी आलेले असून काेविड कालावधीत सर्व शाळा बंद होत्या. कर्मचारीही कामावर येत नव्हते. सर्वत्र लाॅकडाऊन असल्यामुळे ते साहित्य वितरीत करता आलेले नाही, असे सांगितले. गटविकास अधिकारी, सभापती व तक्रारदार यांच्याशी चर्चा करून लवकरच हे साहित्य शाळांमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.