रत्नागिरी : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या माध्यमातून मोठे शैक्षणिक बदल घडवणारे माजी प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष देव यांचे मंगळवारी सायंकाळी गोवा येथे निधन झाले.चारच दिवसांपूर्वी ते गोव्याला आपल्या मुलीकडे राहण्यासाठी गेले होते. त्यातही एक दिवस ते मालवणच्या महाविद्यालयात एका बैठकीसाठी आले होते. तेथून ते परत गोव्याला गेले. मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली.रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्राध्यापक म्हणून रुजू झालेले डॉ. देव १९९५ साली प्राचार्य झाले. संस्थाध्यक्ष अरुआप्पा जोशी यांच्या खांद्याला खांदा लावून संस्थेचा विस्तार करण्यात त्यांचा खूप मोठा हातभार होता.माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून संस्थेला देणगी मिळवून संस्थेचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. रत्नागिरी जिल्ह्यातीलच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण संस्थांनाही एकत्र आणण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्या माध्यमातून कोकण बोर्डाचा प्रश्न मार्गी लावण्यातही ते पुढे होते.महाविद्यालयात डॉ. देव यांच्या काळातच अनेक संलग्न अभ्यासक्रम सुरू झाले. त्यांच्या कामामुळेच नॅक मूल्यांकनात महाविद्यालय कायम अव्वल होते. २०१४ साली ते प्राचार्य पदावरुन निवृत्त झाले होते.स्वप्न अपूर्ण राहिलेकोकणासाठी विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठाची गरज आहे, हे ते पोटतिडकीने मांडत असत. कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे, हे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले.
शिक्षणतज्ज्ञ सुभाष देव यांचे गोव्यात निधन, कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे हे त्यांचे स्वप्न अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 5:20 PM