रत्नागिरी : जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अवकाळी पावसाचा मुक्काम मंगळवारपर्यंत लांबला आहे. गेल्या २४ तासांत सरासरी ३३.८९ मिलिमीटर, तर एकूण ३०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या चक्रीवादळाने रविवारी तसेच सोमवारी झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू असून, तू पूर्ण होण्यासाठी अजून काही दिवस लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
रविवारी जिल्ह्यात दाखल झालेले तौक्ते चक्रीवादळ शमले असले, तरी त्याच्या प्रभावामुळे मंगळवारी सकाळपर्यंत पावसाने हजेरी लावली होती. रत्नागिरीत सर्वाधिक १०१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. रविवारी चक्रीवादळ शमताच रत्नागिरी आणि राजापूर या दोन्ही तालुक्यांतील पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी दापोली, मंडणगड, गुहागर या तालुक्यांमध्ये पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्यात १०२८ घरांचे आणि ७ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामध्ये गुहागर, संगमेश्वर येथे प्रत्येकी १, रत्नागिरी आणि राजापूरमध्ये प्रत्येकी ३ असे एकूण ८ व्यक्ती जखमी झाल्या. ४ जनावरे मृत झाली आहेत. जिल्ह्यामध्ये ४५० झाडांची पडझड झाली असून, १४ दुकाने व टपऱ्यांचे ९ शाळांचे, तर २१ शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. १२३९ गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे कर्मचारी तो तातडीने सुरू करण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत.