गणपतीपुळे : गणपतीपुळे येथील तीर्थक्षेत्रात दरवर्षी होत असलेल्या जिल्हास्तरीय सरस उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होत आहे. यामुळे खऱ्या अर्थाने महिला बचत गटांचा संघटीतपणा दिसून येत आहे. यातूनच तालुकास्तरावर बचत गटांना विक्री करण्याची संधी प्राप्त व्हावी, जेणेकरुन एक चांगली बाजारपेठ महिला बचत गटांच्या आर्थिक उन्नतीसाठी उपलब्ध होईल, असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांनी व्यक्त केला.गणपतीपुळे मंदिर परिसरात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रत्नागिरी यांच्यावतीने २४ डिसेंबरपासून सुरु झालेल्या जिल्हास्तरीय सरस उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती डॉ. अनिल शिवगण, रत्नागिरी पंचायत समितीचे सभापती प्रकाश साळवी, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ता कदम, गणपतीपुळे देवस्थानचे सरपंच डॉ. विवेक भिडे, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती शीतल जाधव, शिक्षण व वित्त सभापती ऐश्वर्या घोसाळकर, महिला व बालकल्याण सभापती प्रज्ञा धनावडे, सदस्य रचना महाडिक, प्रकल्प संचालक डॉ. विवेक पनवेलकर आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रदर्शनात राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराचे वितरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये मंडणगड, दापोली, संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी व गुहागर तालुक्यातील सर्वोत्कृष्ट बचत गटांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या बचत गट प्रदर्शनात एकूण ८६ बचत गट सहभागी झाले असून, प्रदर्शन २८ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. पहिल्या दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. (वार्ताहर)
बचत गट प्रदर्शनातून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न : राजापकर
By admin | Published: December 24, 2014 11:15 PM