लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : संचारबंदी करूनही अजून रुग्णसंख्या आटोक्यात आली नसल्याने आरोग्य विभागावरील ताण कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र असल्याने चाचण्या वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या तीनपट चाचण्या दुसऱ्या पंधरवड्यात करण्यात आल्या असून, रुग्णसंख्या सुमारे चौपटीने वाढली आहे. या काळात रुग्ण बरे होण्याचा वेग मात्र दुप्पटच राहिला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, राज्य सरकारने प्रथम वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला. त्याने कोणताही फरक पडत नसल्याने आणि रुग्णवाढीचा वेग अफाट वाढल्याने अखेर १५ एप्रिलपासून राज्यात सर्वत्र कडक संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, संचारबंदीनंतरही कोरोना रुग्णवाढीची गती थांबलेली नाही. किंबहुना, संचारबंदी सुरू झाल्यापासून रुग्णांची संख्या अधिकच वाढली आहे.
राज्यात सगळीकडेच रुग्ण वाढत असल्याने आणि लाटेत या संसर्गाची गती अधिक असल्याने रुग्ण लवकर निष्पन्न व्हावेत, यासाठी चाचण्यांवर भर देण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातही ३१ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत ९,३२५ चाचण्या करण्यात आल्या. या काळात २,५७९ रुग्ण सापडले, तर याच काळात १,२२४ जण कोरोनामुक्त झाले. पुढील १५ दिवसांत म्हणजेच संचारबंदी काळात १५ एप्रिल ते ३० एप्रिल या काळात तब्बल २७ हजार ५०८ चाचण्या झाल्या. या काळात ८,६६२ रुग्ण सापडले, तर ३,५६५ जण कोरोनामुक्त झाले.