चिपळूण : चिपळूण-गुहागर मार्गावर रिगल कॉलेजनजिक भरधाव वेगाने निघालेल्या कारने डमडम आणि रिक्षाला धडक दिली. या तिहेरी अपघातात नऊजण जखमी झाले आहेत. यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. डमडममधील २० दिवस व सहा महिन्याची दोन बालके दैव बलवत्तर म्हणून सुखरूप बचावली आहेत.
चिपळूण गुहागर मार्गावर हा अपघात मंगळवारी सकाळी 12:30 वाजण्याच्या सुमारास झाला. गोवळकोट रोडकडून गुहागरच्या दिशेने जाणारी कार रिगल कॉलेजच्या अलिकडे आली असता समोरून गुहागरकडून येणाऱ्या डमडमला या कारने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ही डमडम प्रवाशांसह रस्त्याच्या बाजूला जाऊन कलंडली. यानंतर भरधाव कारने समोरून येणाऱ्या रिक्षाला देखील जोरदार धडक दिली आणि रिक्षाही पलटी झाली आणि या अपघातात प्रवासी जखमी झाले. यामध्ये गुहागर तालुक्यातील कोंडकारूळ येथील सुभाष कृष्णा अडूरकर (26), प्रतिक जाक्कर, डमडम चालक अमर मोरे (रा. वेळणेश्वर), सिया अडूरकर तर चिमुकल्या मुली रिया जाक्कर व उर्वी जाक्कर या सुदैवाने बचावल्या. उर्वरित लोकांना किरकोळ दुखापत झाली तर रिक्षामधील चालक संजय साबळे (रा. कोंढे माळवाडी) यांना गंभीर दुखापत झाली असून पायाला फ्रॅक्चर झाले आहे.
विद्यार्थी रूद्र भारद्वाज हा गंभीर जखमी झाला असून त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तर एक मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. या प्रकरणी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघात झाल्यानंतर या चालकाने पळण्याचा प्रयत्न केला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमींना तत्काळ येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत. या अपघातात रिक्षा व डमडमचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना रूग्णालयात हलविल्यानंतर कोंढे परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.