गुहागर : तालुक्यातील गिमवी येथे २००९ मध्ये झालेल्या जमीन विक्रीमध्ये मूळ जागा मालकाऐवजी बनावट व्यक्ती उभे करून जमीन विक्री केल्याप्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात तत्कालीन दुय्यम निबंधकांसह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिमवी येथील समीर राजाराम जाधव यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये १७ ऑगस्ट २००० रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत गुन्हा घडल्याचे म्हटले आहे. समीर जाधव यांच्या सामायिक मालकीची सर्वे नंबर ८९० ही मिळकत आहे. या जमीन मिळकतीमध्ये त्यांच्या आईऐवजी दुसरी बनावट व्यक्ती दुय्यम निबंधक यांच्यासमक्ष उभी करण्यात आली. त्यानंतर बनावट खरेदी खत तयार करून फसवणूक करून जमीन विक्री केल्याचे म्हटले आहे.
याप्रकरणी किशोर किसन जाधव, पंकज रजनीकांत खेडेकर, सुमित्रा किसन जाधव (मृत), संतोष किसन जाधव, कृष्णा गणपत जाधव (मृत, सर्व राहणार गिमवी), भैरू मल सोगा लाल ओसवाल (रा. चिपळूण), अमित विश्वपाल चव्हाण (रा. गुहागर) व तत्कालीन दुय्यम निबंधक यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ४२०, ४१९, ४६४, ४६५, ४६८,४७१ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार हनुमंत नलावडे करत आहेत