शिवसेना फुटल्यानंतर आता दोन्ही गटांकडून शिवसेनेच्या गडांमध्ये जाहीर सभा होऊ लागल्या आहेत. अशातच उद्धव ठाकरेंनीरामदास कदमांच्या गडात दणक्यात सभा घेऊन धुरळा उडवून टाकला होता. त्याला १५ दिवस नाही होत तोच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच मैदानात प्रत्युत्तर देणार आहेत.
खेड मधील गोळीबार मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार, यापेक्षा ते किती गर्दी जमविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेला तुफान गर्दी झाली होती. यामुळे रामदास कदमही आपले शक्तीप्रदर्शन करणार आहेत. शिंदेंपेक्षा फुटीवेळी अश्रू गाळणारे रामदास कदम काय बोलतात, कोणते कोणते गौप्यस्फोट करतात याकडेही शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत या सभेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.
एकनाथ शिंदेंच्या सभेआधी खेडचे स्थानिक आमदार आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी या सभेची माहिती देत टिझर पोस्ट केला होता. गोळीबार मैदान हाउसफुल करण्यासाठी शिवसैनिकांची नियोजनाची कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात येत आहे.
दरम्यान, या सभेपूर्वी शिंदे गटाला जोरदार धक्का बसला आहे. आमदार योगेश कदम यांचे कट्टर समर्थक दापोली नगपंचायत माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुसाळकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने खेळ गोळीबार मैदान येथे जाहीर सभा ठेवली आहे. सभेच्या पूर्वसंध्येलाच शिवसेनेला हा मोठा झटका बसला आहे.