लांजा : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये दुकान गेल्याच्या नैराश्यातून वृद्धाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ६.३० वाजता घडली. राजाराम भिकाजी मठकर (६५, रा. रोहिदासवाडी, मठ, लांजा) असे या वृद्धाचे नाव असून, चौपदरीकरणाच्या कामामुळे नुकसान होऊन आत्महत्या केल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.तालुक्यातील मठ रोहिदासवाडी येथील राजाराम मठकर यांचे पाली येथे चप्पलचे छोटेसे दुकान होते. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. रुंदीकरणाच्या आतमध्ये असलेले खोके, टपऱ्या यांना हटविण्यात आले. त्यामध्ये मठकर यांचे चप्पल दुकानही हटविण्यात आले. उदरनिर्वाहाचे साधनच गेल्याने त्यांना नैराश्य आले आणि ते तीन ते चार दिवस शांतच होते. रविवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान कोणालाही न सांगता ते घराबाहेर पडले.पती घरात नसल्याचे काही वेळाने लक्षात आल्यानंतर त्यांच्या पत्नीने वाडीतील ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर शोधाशोध सुरू केली. वाडीच्या जवळपास असलेल्या विहिरीकडे सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान शोध घेतला असता विहिरीच्या बाहेर त्यांच्या चप्पल दिसल्या. ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले मात्र पाण्यात काहीच दिसत नव्हते. ग्रामस्थांनी विहिरीत उतरून तपासणी केली असता राजाराम मठकर हे विहिरीच्या तळाशी आढळले. याबाबत पोलीस पाटील संदेश लोकम यांना माहिती देण्यात आली. राजाराम मठकर यांचा देह ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीच्या बाहेर काढण्यात आला.पोलीस पाटील यांनी लांजा पोलीस यांना पूर्वकल्पना दिल्यावरून उपनिरीक्षक श्वेता पाटील, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, राजेंद्र वळवी, बापूसो काटे, चालक चेतन घडशी आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. लांजा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर शव नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. राजाराम मठकर यांनी आत्महत्या केल्याची खबर त्यांचे चुलत भाऊ संजय तानाजी मठकर यांनी दिल्यावरून लांजा पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.