गणपतीपुळे : मालगुंड येथील तळेपाटवाडी येथील पुरुषोत्तम रामचंद्र शिंदे (९७) यांनी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.
ही घटना ७ रोजी सकाळी ७.१५ वाजता घडली. घटनेची खबर मिळताच गणपतीपुळे पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सागर गिरीगोसावी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मालगुंड प्राथमिक केंद्रात पाठविण्यात आली.
तीर्थक्षेत्र असल्याने गणपतीपुळे येथे भाविक, पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यातून रस्ता अपघात किंवा पर्यटक बुडण्यासारखे अपघात घडतात. असे असतानाही मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने हाल होत आहेत. येथे वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे शवविच्छेदनासाठी शिंदे यांचा मृतदेह रत्नागिरी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यामुळे तळेपाटवाडीतील ग्रामस्थांसह मालगुंड गणपतीपुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील व पोलीस कॉन्स्टेबल सागर गिरीगोसावी करत आहेत.